वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताचा आव्हानवीर डी. गुकेशने रविवारी येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील चुरशीच्या सहाव्या लढतीत गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनला काळ्या सोंगाट्यासह खेळताना बरोबरीत रोखले. सलग तिसऱ्या बरोबरीमुळे दोन्ही खेळाडूंचे समान 3 गुण झाले असून विजेतेपदासाठी अजून 4.5 गुणांची आवश्यकता आहे.
दोन्ही खेळाडूंनी 46 चालींनंतर सामना बरोबरीत सोडविण्याचे ठरविले. हा या स्पर्धेतील चौथा अनिर्णित सामना आहे. ही लढत अर्ध्यावर पोहोचत आलेली असताना दोन्ही खेळाडू आता कोणती रणनीती निवडतात हे पाहावे लागणार आहे. 32 वर्षीय लिरेनने सुऊवातीचा सामना जिंकला होता, तर 18 वर्षीय गुकेशने तिसऱ्या लढतीत विजय मिळवला होता. दुसरा, चौथा आणि पाचवा सामना अनिर्णीत राहिला.
14 फेऱ्यांच्या या लढतीत अजूनही आठ सामने शिल्लक असून सोमवारी दुसऱ्या विश्रांतीचा दिवस आहे. त्यानंतर लढत पुन्हा सुरू होईल. जरी लिरेनचे आव्हान फारसे कडवे नाही असे मत बहुतेक सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी व्यक्त केलेले असले, तरी तो प्रत्येक सामन्यानिशी आपला आत्मविश्वास वाढवत चालला असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळताना लिरेनने आपल्या ओपनिंगच्या बाबतीत समस्या सोडवल्या आणि सुपर-सॉलिड लंडन सिस्टीममध्ये प्रवेश करताना फक्त सात मिनिटांत पहिल्या 20 चाली केल्या. गुकेशने खेळाच्या पहिल्या भागात 50 मिनिटांपेक्षा थोडा जास्त वेळ वापरल्याने स्पर्धेत प्रथमच लिरेनला 45 मिनिटांची आघाडी मिळाली. तथापि, 20 व्या चालीवर गुकेशने समीकरण बदलले. त्यानंतर लिरेनने बराच वेळ विचार केला आणि चालींची पुनरावृत्ती करत सामना बरोबरीत सोडविण्याचा पवित्रा घेतला. जबरदस्त लढाऊ गुणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गुकेशने बिनशर्त बरोबरीचा प्रस्ताव नाकारून सर्वांनाच चकीत करून सोडले. ही चांगली लढत 46 चालींपर्यंत टिकून त्यानंतर बरोबरीचाच मार्ग पकडावा लागला.









