वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताचा आव्हानवीर डी. गुकेशने शनिवारी येथे गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनविऊद्धच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या सामन्यात पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना खडतर लढतीनंतर बरोबरी साधण्यात यश मिळविले. सलग दुसऱ्या बरोबरीमुळे दोन्ही खेळाडूंचे समान 2.5 गुण झाले असून स्पर्धा जिंकण्यासाठी अजून 5 गुण हवे आहेत.
दोन्ही खेळाडूंनी 40 चालीनंतर सामना बरोबरीत सोडविला. बरोबरीत सुटलेला हा तिसरा सामना आहे. 18 वर्षीय गुकेश हा जगज्जेतेपदासाठीचा सर्वांत तऊण आव्हानवीर असून त्याने बुधवारी तिसरा सामना जिंकला होता. दुसरा आणि चौथा सामनाही बरोबरीत सुटला होता, तर 32 वर्षीय लिरेनने सुऊवातीचा सामना जिंकला होता.
आतापर्यंतच्या सामन्यांचा विचार करता लिरेनला काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना कोणतीही अडचण न येण्याची ही पहिलीच वेळ होती. गतविजेता निश्चिंत असल्याचे यावेळी दिसून आले. गुकेशने यावेळी पुन्हा ‘किंग्ज-पॉन ओपनिंग’चा वापर केला आणि स्पर्धेत दुसऱ्यांदा फ्रेंच बचावाचा सामना केला. पहिला सामना गमावलेला असल्याने गुकेशने सावध पवित्रा घेतला. वरील ओपनिंगचा बऱ्याच वेळा वापर झालेला असल्याने लिरेनला मुकाबला करण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत.
गुकेश आणि लिरेन लवकरच समान पातळीवरील स्थितीत पोहोचले. त्यानंतर भारतीय खेळाडूने ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. पण लिरेनची कसोटी लागेल असे क्षण आले नाहीत. नियमांनुसार, खेळाडूंनी किमान 40 चाली पूर्ण करायच्या असतात. एकदा त्या पूर्ण झाल्यानंतर पुढे खेळाचा निकाल बदलेल अशी काहीही चिन्हे दिसत नसल्याने बरोबरीवर समाधान मानण्यात आले.









