वृत्तसंस्था/ सिंगापूर
अर्ध्या डझन बरोबरी आणि काही संधी हुकल्यानंतर आव्हानवीर डी. गुकेश आणि गतविजेता डिंग लिरेन आज शनिवारी येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या 10 व्या सामन्यात जेव्हा आमनेसामने येतील तेव्हा यश मिळविण्यासाठी आसुसलेले असतील. गुकेशने अनेक वेळा विजयाचे मार्ग उघडले, परंतु त्याची परिणती शेवटी भारतीयाच्या विजयात झाली नाही.
2.5 दशलक्ष डॉलर्स बक्षीस रकमेच्या या लढतीत आणखी फक्त पाच क्लासिकल सामने खेळायचे बाकी असताना 18 वर्षांचा गुकेश ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करेल. शुक्रवारी एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज निर्णायक आघाडी घेण्याची आशा तो निश्चितच बाळगून असेल. गुऊवारी एकंदरित सातवी आणि सलग सहावी बरोबरी नोंदली गेली होती. त्यामुळे दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी 4.5 गुण झाले आहेत. लढत जिंकण्यासाठी त्यांना आणखी तीन गुण हवे आहेत.
32 वर्षीय लिरेनने सुऊवातीचा सामना जिंकला होता, तर गुकेशने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला होता. इतर सर्व सामने अनिर्णीत राहिले. इतिहासाचा विचार केल्यास आठ सामन्यांनंतर गुणसंख्या 4-4 अशी बरोबरीत राहिलेल्या वेळी विद्यमान विश्वविजेता किताब जिंकण्यात यशस्वी झालेला आहे आणि आताही तशीच स्थिती निर्माण झालेली आहे.
गुकेशला माहीत आहे की, त्याला त्याच्या चिनी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध कठोरपणे मुसंडी मारावी लागेल. लिरेनला परिस्थिती विपरित असताना विविध युक्त्या वापरून उसळी घेण्याची सवय आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला पाच वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याने नवव्या सामन्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गुकेशसाठी वेळ संपत आली असल्याचे म्हटले आहे. मला वाटते की, आम्ही शेवटी अशा स्तरावर पोहोचलो आहेत जेथे गुकेशचे पारडे जड राहिलेले नाही. आता पारडे समतोल झालेले आहे, असे कार्लसनने म्हटले आहे.
14 फेऱ्यांनंतरही कोंडी सुटली नाही तर, विजेता निश्चित करण्यासाठी वेगवान वेळेच्या नियंत्रणाखाली सामने खेळविले जातील. तिथे गुकेशच्या हातातील अनुकूलता निसटू शकते. कारण कमी वेळेच्या सामन्यांत लिरेनला अनुकूलता राहते असे म्हटले जाते.









