वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि गतविजेता डिंग लिरेन हे सलग तीन सामने अनिर्णीत अवस्थेत राहून बरोबरीत राहिल्यानंतर आज मंगळवारी येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या सातव्या फेरीत कोंडी फोडण्याचे लक्ष्य बाळगून असतील.
अनेक बुद्धिबळ पंडितांनी जेतेपदाचा दावेदार म्हणून ज्याचा गौरव केला आहे तो 18 वर्षीय गुकेश हा या जेतेपदाचा सर्वांत तऊण आव्हानवीर आहे. पण तो आपला दर्जा दाखवू शकलेला नाही आणि चिनी प्रतिस्पर्ध्याच्या सुरक्षित पद्धतीने केलेल्या खेळावर किंवा चांगल्या पद्धतीने खेळताना लिरेनने केलेल्या चुकांवर बराचसा अवलंबून राहिलेंला आहे. दोघेही सध्या प्रत्येकी तीन गुणांनिशी बरोबरीत आहेत.
पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळताना पराभूत झाल्यानंतर पहिला सामनाच गुकेशसाठी धोक्याचा इशारा देणारा ठरला होता, तर दुसरा सामना आत्मविश्वास वाढवणारा होता. कारण लिरेनने काहीही केले नव्हते आणि सहज सामना बरोबरीत सुटू दिला होता. गुकेशने तिसरा सामना जिंकलेला असला, तरी त्याला लिरेनने आशादायक स्थितीत घातलेला घोळ कारणीभूत होता. चौथ्या सामन्यात गुकेशने पुन्हा दमदार खेळ केला आणि लिरेनला फारसे उत्तर न देता येऊन हा सामनाही बरोबरीत सुटला.
या टप्प्यावर लिरेन गुकेशच्या हातून चुका घडाव्यात यावर भर देत असल्याचे स्पष्ट झाले झाले. पाचव्या सामन्यात गुकेश कोंडी फोडण्यासाठी लढताना दिसला आणि त्या भरात तो इतका पुढे गेला की, एंडगेममध्ये धोक्यात आला. परंतु लिरेन त्याचा फायदा उठविण्यात पुन्हा अयशस्वी ठरला आणि आणखी एका बरोबरीची नोंद झाली.
अनेक जागतिक अजिंक्यपदाच्या लढतींतील सहाव्या सामन्याला मोठा इतिहास लाभलेला आहे आणि यावेळीही चाहत्यांसाठी सहावा सामना निराशा करणारा राहिला नाही. गेल्या जागतिक स्पर्धेत लिरेनने सहाव्या सामन्यात रशियाच्या इयान नेपोम्नियाचीचा पराभव केला होता, तर 1972 मध्ये बॉबी फिशरने बोरिस स्पास्कीला पराभूत केले होते. तो आजही जगभरातील अनेक बुद्धिबळ चाहत्यांचा आवडता सामना आहे. गुकेशने सहाव्या सामन्यात लवकर आलेला बरोबरीचा प्रस्ताव नाकारून लढत चालू ठेवणे पसंत केले. तथापि, स्थिती गुंतागुंतीची राहून लिरेनने अखेरच्या टप्प्यात कोणतीही जोखीम पत्करली नाही. ही सहा सामन्यातींल चौथी बरोबरी होती.
मला वाटते की, आतापर्यंतची माझी वाटचाल चांगली राहिलेली असून मी अजूनही माझ्या खेळात सुधारणा करू शकतो. अजून बरीच लढत बाकी आहे. पहिल्या सामन्यानंतर मी पिछाडीवर पडलो होतो हे लक्षात घेता मला या टप्प्यावर पोहोचल्याचा आनंद आहे, असे गुकेशने म्हटले आहे. आज मंगळवारी भारतीय खेळाडू पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळेल. पुढील तीन सामन्यांत गुकेश दोनदा पांढऱ्या आणि एकदा काळ्या सोंगाट्या घेऊन खेळेल. ही कदाचित भारतीय खेळाडूसाठी पुढे जाण्याची आणि दबाव आणण्याची सर्वोत्तम संधी असेल.









