वृत्तसंस्था/ विज्क आन झी (नेदरलँड्स)
भारतीय ग्रँडमास्टर गुकेशने डच खेळाडू मॅक्स वॉर्मरडॅमला नमवून तिसरा विजय नोंदविताना येथे झालेल्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीनंतर संयुक्त आघाडी घेतली. या निकालासह गुकेशने संभाव्य सातपैकी 4.5 गुण कमावले आहेत आणि आता उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह आणि नेदरलँड्सचा अनीश गिरी यांच्यासमवेत तो आघाडीवर आहे.
वॉर्मरडॅमने पहिल्या तीस चालींत गुकेशला चकीत केले होते. पण गुकेशने नंतर सावरून 66 चालींमध्ये अतिशय समाधानकारक विजय नोंदविला. दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीलाच विदित गुजराथी गोटात जल्लोष झाला, कारण त्याने फ्रान्सच्या फिरोझा अलीरेझाला नमवून स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. या विजयामुळे गुजराथीला चार गुणांनिशी आर. प्रज्ञानंद आणि अलीरेझा यांच्यासह संयुक्तरीत्या चौथ्या स्थानावर राहण्यास मदत झाली आहे.
आर. प्रज्ञानंदला यजमानांच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टसोबत बरोबरीवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, गिरीला अब्दुसत्तारोव्हकडून पराभव पत्करावा लागला. चॅलेंजर्सच्या विभागात, लिओन ल्यूक मेंडोंसाने बेल्जियमच्या स्टीफन बेउकेमाचा, तर दिव्या देशमुखने नेदरलँड्सच्या लियाम व्रोलिज्काचा पराभव केला. अन्य एक भारतीय बुद्धिबळपटू डी. हरिकाने युक्रेनच्या कोरोबोव्हसोबत बरोबरी साधली.









