वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
सेंट लुईस येथे होणाऱ्या सिंकेफिल्ड कपच्या सहाव्या फेरीत विश्वविजेता डी. गुकेशला फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजाचा सामना करावा लागणार आहे, तर त्याचा सहकारी आर. प्रज्ञानंदची पोलंडच्या दुडा जान-क्रिज्स्टोफशी गाठ पडेल.
उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये विश्रांतीच्या दिवसानंतर जास्त तीव्र लढती पाहायला मिळतात आणि अर्ध्या टप्प्यानंतर प्राग आणि गुकेश हे दोघेही पुन्हा एकदा खेळ सुरू झाल्यावर आणखी जोर लावतील. स्थानिक हिरो फॅबियानो काऊआना आतापर्यंत दोन विजय आणि तीन बरोबरीसह 3.5 गुण घेऊन आघाडीवर आहे. पहिल्या फेरीत गुकेशवर मिळविलेला एकमेव विजय खात्यात असलेला प्रज्ञानंद फक्त अर्ध्या गुणाने मागे आहे. त्याचे 3 गुण झालेले आहेत. त्या विजयानंतर त्याने सलग चार बरोबरी साधल्या आहेत.
दुसऱ्या स्थानावर संयुक्तरीत्या असलेला आर्मेनियन-अमेरिकन खेळाडू लेव्हॉन अॅरोनियन देखील फॉर्मात आहे. तर वेस्ली सो आणि सॅम्युअल सेव्हियन, फ्रान्सचा मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह, फिरोजा आणि गुकेश हे पाच खेळाडू प्रत्येकी 2.5 गुणांसह फारसे दूर नाहीत. आणखी अर्ध्या गुणाने पिछाडीवर असलेला दुडा हा शेवटच्या स्थानावर असलेल्या उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हपेक्षा पूर्ण गुणाने आघाडीवर आहे.
फिरोजा हा एक कठीण प्रतिस्पर्धी आहे, परंतु गुकेशने काही कठीण प्रसंगांत टिकाव धरून पहिल्या फेरीतील पराभवानंतर जोरदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात गुकेशकडे पांढऱ्या सोंगाट्या असतील. ही वस्तुस्थिती भारतीय खेळाडूच्या बाजूने पारडे थोडेसे झुकवते. त्याला शेवटच्या चार फेऱ्यांमध्ये कलाटणी देणाऱ्या कामगिरीची आवश्यकता आहे. प्रज्ञानंदने शानदार विजयाने सुऊवात केली, परंतु नंतर तो गेल्या चार सामन्यांमध्ये विजयाच्या शोधात राहिला आहे. भारतीय खेळाडूसमोर दुडाविरुद्ध ही कोंडी फोडण्याची उत्तम संधी आहे.









