वृत्तसंस्था/ हॅम्बुर्ग (जर्मनी)
सध्या येथे चालू असलेल्या फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक विजेता डी. गुकेशला पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसलेला असला, तरी अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाविऊद्ध त्याला पुनरागमन करण्याची संधी मिळेल.
रविवारी गुकेशला दुर्मिळ धक्का बसला आणि क्वॉर्टरफायनलच्या पहिल्या गेममध्ये काऊआनाकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय खेळाडूवर आता काळ्या सेंगट्यांसह खेळताना प्रभावी कामगिरी करण्याचा आणि काही वर्षांपासून विश्वविजेता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काऊआनाशी बरोबरी करण्याचा दबाव असेल. फ्रीस्टाइल बुद्धिबळमध्ये सुमारे 960 पोझिशन्सचा समावेश राहतो, ज्यामध्ये सेंगट्यांची मूळची स्थाने बदलतात आणि प्यादी अबाधित राहतात.
दिग्गज बॉबी फिशर हे फ्रीस्टाइल बुद्धिबळाचे समर्थन करणारे पहिले खेळाडू होते आणि नवीन स्वरूपाला मिळालेल्या पाठिंब्यामुळे ते या खेळाचे भविष्य ठरू शकते. गुकेशला आता कठोर संघर्ष करावा लागेल, कारण उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या गेममध्ये काऊआनावर पराभवाचे सावट पसरले होते. पण परतीच्या लढतीत त्याचा उत्साह वाढलेला राहणार आहे. पहिल्या गेममध्ये गुकेशचे पारडे बहुतेक वेळ जड राहिले आणि जेव्हा आवश्यकता भासली तेव्हा त्याने सुधारणा केल्या. परंतु मधल्या खेळाच्या शेवटच्या टप्प्यातील परिस्थिती त्याला महागात पडली. काऊआनाने मग पटकन परिस्थितीचा फायदा घेतला आणि त्याने सामना आपल्या हातातून निसटू दिला नाही.
दरम्यान, या स्पर्धेमागील मुख्य नायक मॅग्नस कार्लसनने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हवर एक उत्तम विजय मिळवला. फ्रान्सचा अलिरेझा फिरोजा पहिल्या सामन्यात जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरकडून पराभूत झाला. यातील लक्षणीय गोष्ट म्हणजे फिरोजानेच कीमरला आपला प्रतिस्पर्धी म्हणून निवडले होते. उपांत्यपूर्व फेरीतील अन्य सामन्यात उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हने हिकारू नाकामुरासोबत बरोबरी साधली, तर महत्त्व नसलेल्या नवव्या स्थानासाठीच्या सामन्यात अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनने स्लोव्हेनियाच्या व्लादिमीर फेडोसेव्हला हरवून आपला पहिला सामना जिंकला.









