आम आदमी पक्षाकडून नव्या पदाधिकाऱयांची घोषणा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये स्वतःच्या संघटनेच्या नव्या पदाधिकाऱयांची घोषणा केली आहे. किशोरभाई देसाई यांना प्रदेशाध्यक्ष तर मनोज सोरथिया यांना राज्य महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. इसुदान गढवी यांना पक्षाने राष्ट्रीय संयुक्त महासचिवपदी नेमले आहे. याचबरोबर आपने चालू वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी नवी टीम उतरविली आहे.
आम आदमी पक्ष गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे पक्षाने राज्यातील स्वतःची संघटना विसर्जित करत नव्या पदाधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. सद्यकाळात आम आदमी पक्षाचे पंजाब आणि दिल्लीमध्ये सरकार आहे. उत्तर गुजरातच्या मेहसाणा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोनंतर पक्षाने नव्या पदाधिकाऱयांचा नेमण्याचा निर्णय घेतला होता.
आगामी विधानसभा निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे पक्षाने म्हटले होते. नव्या संघटनेत आम आदमी पक्षाने गुजरात संयोजकपदासह अन्य सर्व पदांवर नव्या पदाधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. आम आदमी पक्षात मागील काही दिवसांमध्ये मोठय़ा संख्येत नेते आणि कार्यकर्ते सामील झाल्याने त्यांना संघटनेत सथान देणे तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मजबूत रणनीति तयार करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बदलण्यात आल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. आम आदमी पक्षाचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात होते, निवडणुकीपूर्वी हे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता होती असेही बोलले जात आहे.









