ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलविण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय धुसफूस सुरू आहे. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यास मविआ सरकारच जबाबदार आहे. आमची सत्ता आली तेव्हा गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्याचा निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात आला होता. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.
फडणवीस म्हणाले, जूनच्या अखेरीस उपमुख्यमंत्री होताच वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची भेट घेतली होती. त्याचवेळी महाराष्ट्राने गुजरातप्रमाणे कंपनीकडे प्रस्ताव ठेवला होता. मात्र, गुजरातमध्ये सेमीकंडक्टर युनिट उभारण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कंपन्यांना कोणतेही अनुदान घेण्यासाठी 10 टक्के कमिशन द्यावे लागत होते. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला.
दरम्यान, गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे. ही दोन्ही राज्य भाऊ-भाऊ आहोत. आम्ही लवकरच गुजरात, कर्नाटक सर्वांना मागे टाकू. मविआ सरकारच्या काळातच आम्ही आमच्या शेजारच्या राज्यापेक्षा मागे पडलो, असा आरोपही त्यांनी केला.








