वृत्तसंस्था/ बडोदा
2025 च्या इंडियन महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स यांच्यातील सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 7.30 वाजता प्रारंभ होईल.
गुजरात जायंट्स संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची गार्डनर करत असून युपी वॉरियर्सचे नेतृत्व अष्टपैलु दिप्ती शर्माकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात विद्यमान विजेत्या आरसीबी संघाविरुद्ध गुजरात जायंट्सने दमदार फलंदाजीचे दर्शन घडविताना 201 धावा जमविल्या होत्या. पण आरसीबीने हा सामना जिंकताना 202 धावांचे उद्दिष्ट गाठले. ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार बेथ मुनी आणि गार्डनर यांनी दमदार अर्धशतके झळकविली होती. आता या स्पर्धेतील गुजरात जायंट्सचा रविवारचा दुसरा सामना असल्याने ते विजयी सलामी देण्यासाठी आतुरलेले आहेत.
युपी वॉरियर्स संघाच्या कप्तानपदाची जबाबदारी अष्टपैलु दिप्ती शर्माकडे पहिल्यांदाच सोपविण्यात आली आहे. या संघाची नियमीत कर्णधार ऑस्ट्रेलियाची अॅलिसा हिली दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतल्याने शर्माकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. गुजरात संघाच्या तुलनेत युपी वॉरियर्स संघाच्या गोलंदाजीची स्थिती खूपच भक्कम वाटते. गेल्या वर्षी यास्पर्धेत युपी वॉरियर्सला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. ताहीला मॅकग्रा इक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, गोहर सुलताना हे या संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. नवोदित सईमा ठाकुर आणि किरण नेवगिरे हे या संघातील उपयुक्त गोलंदाज आहेत. युपी वॉरियर्सचा संघ या सामन्यात गुजरातवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.









