वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत शनिवारी येथे यजमान दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत दिल्लीला पुन्हा दुसऱ्यांदा हैदराबादवर विजय मिळवयाचा असेल तर त्यांची फलंदाजी सुधारणे जरुरीचे आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत केवळ दोन विजय नोंदवले आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात हा संघ सध्या शेवटच्या स्थानावर आहे. गेल्या सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादचा 7 धावांनी पराभव केला होता. सनरायजर्स हैदराबाद संघाने या स्पर्धेत गेले तीन सामने गमवले असल्याने हा संघ आता शनिवारच्या सामन्यात आपली पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी प्रयत्न करेल. कर्णधार डेविड वॉर्नरच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आपल्या फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि मुकेशकुमार हे दिल्ली कॅपिटल्स संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. इशांत शर्मा आणि नॉर्त्जे यांनाही नव्या चेंडूवर चांगली कामगिरी करावी लागेल. हैदराबाद विरुद्धच्या गेल्या सोमवारच्या सामन्यात मुकेशकुमारने आपल्या शेवटच्या षटकात केवळ 12 धावात देत दिल्लीला विजय मिळवून दिला होता. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांनी या सामन्यात आपल्या 8 षटकात 43 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले होते. मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांनी या सामन्यात दिल्ली संघाला 128 धावापर्यंत नेले होते. तत्पुर्वी त्यांची या सामन्यातील स्थिती 5 बाद 62 अशी होती. दिल्ली संघाला अद्याप चांगला सलामीचा फलंदाज मिळालेला नाही. कर्णधार वॉर्नर एका बाजूने बऱ्यापैकी फलंदाजी करत असताना त्याला दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळत नाही. फिल सॉल्ट सलामीला प्रभावी ठरू शकला नाही तर मिचेल मार्श धावा जमवण्यासाठी झगडत आहे. मिचेल मार्शने गेल्या पाच डावामध्ये केवळ 31 धावा जमवल्या आहेत. सर्फराज खान आणि अमन हकीम खान यांनाही सूर मिळालेला नाही. या संघातील अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी आतापर्यंत बरी झाली असली तरी त्याची ही कामगिरी दिल्ली संघाला अधिक विजय मिळवून देण्यात कमी पडत आहे.
हैदराबाद संघाचे नेतृत्व मारक्रेमकडे आहे पण गेल्या तीन सामन्यामध्ये त्याची फलंदाजी प्रभावी झालेली नाही. या संघाकडून गेल्या तीन सामन्यात डावाला धिमी सुरुवात होत असल्याने त्यांना अखेरच्या षटकात धावांचा पाठलाग करताना झगडावे लागत आहे. हॅरी ब्रुकने या स्पर्धेत पहिले शतक झळकवले होते पण त्यानंतर त्याची फलंदाजी चांगली झाली नाही. त्याने अन्य पाच सामन्यात अनुक्रमे 13, 3, 9, 18 आणि 7 धावा जमवल्या आहेत. इंग्लंडचा हॅरी ब्रुक हैदराबाद संघाला दणकेबाज सुरुवात करून देण्यात अपयशी ठरला आहे. मयांक अगरवालने आतापर्यंत दोन सामन्यात 40 पेक्षा अधिक धावा जमवल्या आहेत. या संघातील राहुल त्रिपाठीने पंजाब किंग्जविरुद्ध नाबाद 74 धावांची खेळी केल्यानंतर तो पुढील काही सामन्यात अधिक धावा जमवू शकलेला नाही. अभिषेक शर्मा सूर मिळवण्यासाठी झगडत आहे. कर्णधार मारक्रेम आणि क्लासेन यांना शनिवारच्या सामन्यात चांगली सलामी करून द्यावी लागेल. भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, आदिल रशीद, मयांक मार्कंडे हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. यापूर्वी झालेल्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात फिरकी गोलंदाज वॉशिंग्टनने तीन गडी बाद केले होते.
दिल्ली कॅपिटल्स : वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, सर्फराज खान, अभिषेक पोरेल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, खलील अहमद, कुलदीप यादव, आर. पॉवेल, रॉसो, नॉर्त्जे, मुश्तफिजूर रेहमान, साकारिया, मुकेशकुमार, सॉल्ट, एन्गीडी, दुबे, ललित यादव, रिपल पटेल, विकी ओस्वाल, इशांत शर्मा, मनीष पांडे, नागरकोटी आणि यश धूल.
सनरायझर्स हैदराबाद : मार्करम (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलीप्स, अभिषेक शर्मा, जान्सेन, वॉशिंग्टन सुंदर, फाऊकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयांक अग्रवाल, हेन्रिक क्लासेन, आदिल रशीद, मयांक मार्कंडे, विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयांक डागर, नितीशकुमार रे•ाr, अकील हुसेन, अनमोलप्रीत सिंग.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वाजता









