आरोपीला सोडून देण्याची न्यायाधीशांची सूचना
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
अलिकडेच सर्वोच्च न्यायालयात एका वकिलांनी सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर बूट फेकल्याचा प्रकार घडल्यानंतर आता गुजरातमधील अहमदाबादमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. मंगळवारी अहमदाबाद सत्र न्यायालयात कामकाजादरम्यान एका व्यक्तीने न्यायाधीशांवर चप्पल फेकली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला ताबडतोब ताब्यात घेतले. तथापि, जिल्हा न्यायाधीशांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्याची सूचना केल्याने त्याला सोडून देण्यात आले.
जिल्हा न्यायाधीशांवर चप्पल फेकणारा माणूस आपण दाखल केलेल्या खटल्यातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने नाराज होता. करंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक पी. एच. भाटी यांनी या प्रकरणाची माहिती दिली. अपील फेटाळल्यानंतर तो माणूस संतापला आणि त्याने न्यायाधीशांवर बूट फेकला, असे त्यांनी सांगितले. जरी त्याला न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असले तरी न्यायाधीशांनी त्याला सोडून देत त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.
न्यायालयाच्या निर्णयामुळे संतप्त होऊन, याचिकाकर्ता कोर्टरूममध्ये मोठ्याने बोलून गैरवर्तन करू लागला. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान त्या व्यक्तीने न्यायाधीशांवर चप्पल फेकली. त्याने फेकलेली चप्पल न्यायाधीशांपर्यंत पोहोचली नाही. या घटनेनंतर गुजरात न्यायिक सेवा संघटनेने सर्वोच्च न्यायालय आणि अहमदाबादमधील शहर दिवाणी न्यायालयात झालेल्या हल्ल्यांचा, धमक्यांचा आणि तोडफोडीचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर केला. अशी कृत्ये न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर, प्रतिष्ठेवर, सुरक्षिततेवर आणि कामकाजावर थेट हल्ला आहेत. न्यायालये भीती, धमकी किंवा हिंसाचारापासून मुक्त असावीत, असे ठरावात म्हटले आहे.









