वृत्तसंस्था/ सुरत
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गुजरातमध्ये 29 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. तथापि, या स्पर्धेमध्ये टेबल टेनिस या क्रीडा प्रकाराला येथे मंगळवारपासून प्रारंभ होईल. या प्रति÷sच्या स्पर्धेचे यजमानपद गुजरातला भूषविण्याची संधी लाभली आहे.
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळविण्यासाठी यजमान गुजरातचा पुरुष टेटे संघ सज्ज झाला आहे. हरमित देसाई आणि मानव ठक्कर हे टेबल टेनिसपटू गुजरातचे प्रतिनिधित्व करीत आहेत. टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात गुजरातच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व यापूर्वीच सिद्ध केले आहे. हरमित देसाई, मानव ठक्कर आणि मनुष शहा यांच्या कामगिरीवर गुजरातची प्रामुख्याने भिस्त राहील. टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात अव्वल टेबल टेनिसपटू शरथ कमल, जी. साथियान आणि मनिका बात्रा हे एकेरी आणि दुहेरी जेतेपदासाठी फेव्हरिट म्हणून ओळखले जातात. या महिन्याच्या अखेरीस होणाऱया विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभागी होणाऱया भारतीय संघामध्ये या खेळाडूंचा समावेश आहे. टेबल टेनिस या क्रीडा प्रकारातील विविध सामने पुढील पाच दिवस येथे चालणार आहेत. 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वीच गुजरात शासनाने टेबल टेनिस स्पर्धेला अगोदरच म्हणजे मंगळवारपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमध्ये झालेल्या 35 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुजरातला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पण यावेळी गुजरातचे पथक दर्जेदार कामगिरी करून अधिक पदके मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. या स्पर्धेच्या पूर्वतयारीला गुजरात शासनाने गेल्या तीन महिन्यांपासून प्रारंभ केला आहे. ही स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्यासाठी गुजरात शासन जोरदार तयारीला लागले असल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री हर्ष संघवी यांनी दिली.









