वृत्तसंस्था/अहमदाबाद
2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गुजरातचा संघ गुरुवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर अंतिम फेरीच्या समिप पोहोचला आहे. या उपांत्य सामन्यात केरळने पहिल्या डावात 457 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर गुजरातने खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर पहिल्या डावात 154 षटकात 7 बाद 429 धावा जमविल्या आहेत. गुजरातचा संघ आता केरळच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा 28 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे तीन गडी खेळावयाचे आहेत. गुजरातच्या पहिल्या डावामध्ये प्रियांक पांचाळने 148 धावांचे योगदान दिले. तर जयमीत पटेल 74 धावांवर खेळत असून सिद्धार्थ देसाई 24 धावांवर खेळत आहे. आर्या देसाईने 73 धावांचे योगदान दिले. गुजरातच्या जयमीतने सावध फलंदाजी करत 161 चेंडूत केवळ 2 चौकार ठोकून 74 धावांवर खेळत आहे. जयमीतची फलंदाजी महत्त्वाची असून त्याला सिद्धार्थ देसाईकडून चांगली साथ मिळत आहे.
संक्षिप्त धावफलक : केरळ प. डाव सर्वबाद 457, गुजरात प. डाव 154 षटकात 7 बाद 429 (प्रियांक पांचाळ 148, जयमीत पटेल 74, आर्या देसाई 73, सिद्धार्थ देसाई खेळत आहे 24, सक्सेना 4-137)









