वृत्तसंस्था/ .अहमदाबाद
2024-25 च्या रणची क्रिकेट स्पर्धेत सोमवारपासून येथे माजी विजेता आणि यजमान गुजरात तसेच केरळ यांच्यात उपांत्य फेरीच्या सामन्याला प्रारंभ होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दाखल होईल. केरळचा संघ या स्पर्धेच्या इतिहासात ऐतिहासिक अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे.
2016-17 च्या रणजी स्पर्धेत गुजरातने विजेतेपद पटकाविले होते. 2019-20 नंतर गुजरात संघाने प्रथमच या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठताना राजकोटमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सौराष्ट्रचा एक डाव आणि 98 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे गुजरात संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. गुजरातचे नेतृत्व चिंतन गजाकडे सोपविण्यात आले आहे. गुजरात संघातील मनन हिंगरेजा, जयमीत पटेल, यष्टीरक्षक आणि फलंदाज उर्विल पटेल यांच्या फलंदाजीत सातत्य राहिले आहे. उर्विल पटेलने यावेळी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आपले पहिले प्रथम श्रेणी शतक झळकाविताना 140 धावा जमविल्या. त्याचप्रमाणे जयमीत पटेलने या स्पर्धेत महत्त्वाचे शतक झळकाविल्याने गुजरातने 582 धावांचा डोंगर उभा केला होता. जयमीतने चालू रणजी हंगामात 2 शतके आणि 4 अर्धशतके नोंदविली आहेत. त्याच प्रमाणे मनन हिंगरेजाने चालू वर्षीच्या रणजी हंगामात 2 शतके नोंदविली आहेत.
केरळ संघाचे नेतृत्व सचिन बेबीकडे आहे. त्याच्या नेतृत्वाखाली केरळने या स्पर्धेत 2018-19 नंतर दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या चुरशीच्या सामन्यात केरळने पहिल्या डावात जम्मू काश्मिरवर केवळ एका धावेची नाममात्र आघाडी घेतल्यानंतर जम्मू काश्मिरला निर्णायक विजयासाठी 399 धावांचे कठिण आव्हान दिले होते. पण हा सामना शेवटच्या दिवशी अनिर्णीत राहिल्याने केरळने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. केरळ संघातील सलमान निझार आणि मोहम्मद अझरूद्दीन यांनी सातव्या गड्यासाठी 115 धावांची शतकी भागिदारी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केली होती. सलमान निझारने 162 चेंडूत नाबाद 44 तर अझरूद्दीनने 118 चेंडूत नाबाद 67 धावा झळकाविल्या होत्या. चालू वर्षीच्या रणजी हंगामात केरळचा सलमान निझार याची फलंदाजी सातत्याने चागली होत आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या डावात नाबाद शतक (112) झळकवले होते. तसेच केरळच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने मोहम्मद निदेशवर राहिली आहे. त्याने जम्मू काश्मिर विरुद्धच्या सामन्यात 10 गडी बाद केले होते.
मोहम्मद निदेशने चालू वर्षीच्या रणजी हंगामात आतापर्यंत 22 गडी बाद केले आहेत. तसेच केरळ संघातील अष्टपैलू जे. सक्सेनाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फलंदाजीत सुमारे 6,900 धावा तर गोलंदाजीत 470 बळी मिळविले आहेत. 38 वर्षीय सक्सेनाने यावर्षी रणजी स्पर्धेत 16.84 धावांच्या सरासरीने 34 गडी बाद केले आहेत









