वृत्तसंस्था/बेंगळूर
कर्णधार व सामनावीर अॅश्ले गार्डनरच्या अर्धशतकाच्या जोरावर गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात गुजरात जायंट्सने आरसीबीचा 21 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी पराभव केला. या विजयानंतर गुजरातने 5 सामन्यातून 4 गुण मिळविले असून हा संघ गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर आहे. तर आरसीबी संघाने 5 सामन्यातून 4 गुणासह चौथे स्थान घेतले आहे. या स्पर्धेतील हा 12 वा सामना होता. गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी दिली. आरसीबीने 20 षटकात 7 बाद 125 धावा जमविल्या. त्यानंतर गुजरात जायंट्सने 16.3 षटकात 4 बाद 126 धावा जमवित विजय नोंदविला.
आरसीबीच्या डावात कनिका आहुजाने 28 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 33, वेरहॅमने 21 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 20, गार्थने 15 चेंडूत 1 चौकारासह 14, बिस्तने 19 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 22, कर्णधार मानधनाने 20 चेंडूत 1 चौकारासह 10 धावा केल्या. एलीस पेरीला खाते उघडता आले नाही. आरसीबीच्या डावात 4 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. गुजरात जायंट्सतर्फे तनुजा कंवर आणि डॉटीन यांनी प्रत्येकी 2 तर गार्डनर आणि गौतम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आरसीबीने पॉवरप्लेच्या 6 षटकात 26 धावा जमविताना 3 गडी गमाविले. आरसीबीचे अर्धशतक 51 चेंडूत तर शतक 99 चेंडूत फलकावर लागले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरात जायंट्सच्या डावात कर्णधार गार्डनरने 31 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 58 तर लिचफिल्डने 21 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 30, मुनीने 20 चेंडूत 2 चौकारांसह 17, हेमलताने 15 चेंडूत 2 चौकारांसह 11, देओलने 5 धावा जमविल्या. गार्डनर आणि लिचफिल्ड यांनी चौथ्या गड्यासाठी 51 धावांची भागिदारी केली. गुजरात जायंट्सच्या डावामध्ये 4 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. आरसीबीतर्फे रेणुकासिंग ठाकुर आणि वेरहॅम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. गुजरात जायंट्सने पॉवरप्लेच्या 6 षटकात 30 धावा जमवितान 1 गडी गमविला. गुजरात जायंट्सने अर्धशतक 50 चेंडूत तर शतक 86 चेंडूत फलकावर लागले. गार्डनरने 28 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक नोंदविले.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी 20 षटकात 7 बाद 125 (आहुजा 33, बिस्त 22, वेरहॅम नाबाद 20, गॅरेथ 14 मानधना 10 अवांतर 12, डॉटीन आणि कंवर प्रत्येकी 2 बळी, गार्डनर आणि गौतम प्रत्येकी 1 बळी), गुजरात जायंट्स 16.3 षटकात 4 बाद 126 (गार्डनर 58, लिचफिल्ड नाबाद 30, मुनी 17, हेमलता 11, अवातंर 5, रेणुकासिंग ठाकुर आणि वेरहॅम प्रत्येकी 2 बळी).









