वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत मंगळवारी येथे विद्यमान विजेता आणि यजमान गुजरात जायंट्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होत आहे. दिल्लीसमोर गुजरात जायंट्सचे मोठे आव्हान राहिल. या स्पर्धेतील आपल्या अस्तित्वासाठी दिल्लीला हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

या स्पर्धेमध्ये दिल्ली संघाची कामगिरी पहिल्या सामन्यापासूनच दर्जाहीन झाली आहे. रुषभ पंतच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत या स्पर्धेत 8 पैकी 6 सामने गमावले असून गुणतक्त्यात हा संघ 4 गुणासह शेवटच्या स्थानावर आहे. आता या स्पर्धेतील त्यांचे 6 सामने बाकी राहिले असून ते सर्व जिंकले तरच त्यांना प्लेऑफची आशा बाळगता येईल. पृथ्वी शॉ आणि सर्फराज खान हे दोन महत्त्वाचे खेळाडू आपल्या कामगिरीत अपयशी ठरले आहेत. मंगळवारच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत कदाचित बदल करण्याची शक्यता असून वॉर्नरच्या समवेत सॉल्टला सलामीला पाठविण्याचा विचार चालू आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू मिचेल मार्शची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली होती. दिल्ली संघाची मधली फळी कमकुवत असून ते खेळाच्या मधल्या सत्रात अधिक गडी गमवित असल्याचे दिसून येते. अष्टपैलू अक्षर पटेल गोलंदाजीपेक्षा फलंदाजीत अधिक चांगली कामगिरी करीत असल्याचे दिसून येते. अक्षर पटेलला कदाचित पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठविण्याची शक्यता आहे. मनिष पांडे धावा जमविण्यासाठी झगडत आहे. कुलदीप यादव, मुकेश कुमार, अक्षर पटेल, नॉर्त्जे हे दिल्ली संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा गेल्या तीन सामन्यात किफायतशीर गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरला आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील विद्यमान विजेत्या गुजरात जायंट्सने 2023 च्या आयपीएल मोहिमेला आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दणकेबाज प्रारंभ केला आहे. कोणत्याही स्थितीमध्ये संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता गुजरातच्या खेळाडूंमध्ये निश्चित दिसून येते. गेल्या शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात 180 धावांचा पाठलाग करताना गुजरात संघातील डेव्हिड मिलर आणि विजय शंकर यांनी दमदार फलंदाजी करत आपल्या संघाला 13 चेंडू बाकी ठेऊन विजय मिळवून दिला होता. गुजरातची फलंदाजी तसेच गोलंदाजीही तितकीच भक्कम आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात गुजरात जायंट्सने आतापर्यंत 8 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे. आयर्लंडचा डावखुरा वेगवाग गोलंदाज जोशुआ लिटल याची गोलंदाजी प्रभावी होत आहे. अफगाणच्या रशिद खान आणि नूर अहमद हे गोलंदाज आतापर्यंत प्रभावी कामगिरी करत असून नूर अहमदने 4 सामन्यात 8 गडी बाद केले आहेत. गिल, मिलर, साईसुदर्शन, साहा, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या हे या संघातील प्रमुख फलंदाज आहेत.
संघ – दिल्ली कॅपिट्ल्स : वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, सर्फराज खान, अमन हखीम खान, अभिषेक पोरल, अक्षर पटेल, खलिद अहमद, कुलदीप यादव, पॉवेल, रॉसो, नॉर्त्जे, मुस्ताफिजूर रेहमान, साकारिया, मुकेश कुमार, सॉल्ट, एन्गिडी, दुबे, ललीत यादव, रीपल पटेल, व्हिकी ओसवाल, इशांत शर्मा, मनिष पांडे, कमलेश नागरकोटी, यश धूल.
गुजरात टायटन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), गिल, मिलर, अभिनव मनोहर, साईसुदर्शन, साहा, वेड, रशिद खान, राहूल तेवातिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, जोसेफ, यश दयाल, प्रदिप सांगवान, दर्शन नलकांडे, जयंत यादव, साई किशोर, नूर अहमद, शनाका, ओडेन स्मिथ, के. एस. भरत, शिवम मावी, यू. पटेल, लिटल आणि मोहित शर्मा.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.









