सामनावीर सोफी डिव्हाईनची तुफानी खेळी
वृत्तसंस्था/ मुंबई
महिलांच्या पहिल्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेतील येथे शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात ‘सामनावीर’ सोफी डिव्हाईनच्या तुफानी आणि आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने गुजरात जायंट्सचा 8 गड्यांनी पराभव करत या स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला.
या सामन्यात कर्णधार स्नेह राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात जायंट्सने 20 षटकात 4 बाद 188 धावा जमवत बेंगळूरला विजयासाठी 189 धावांचे तगडे आव्हान दिले पण त्यानंतर सोफी डिव्हाईन आणि कर्णधार मानधना यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 15.3 षटकात केवळ 2 बाद 189 धावा जमवत हा सामना 8 गड्यांनी जिंकला.
गुजरात जायंटसच्या डावामध्ये वुलव्हर्टने 42 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारासह 68, डंक्लेने 10 चेंडूत 3 चौकारासह 16, मेघनाने 32 चेंडुत 4 चौकारासह 31, गार्डनरने 26 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 41, हेमलताने 6 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 16 तर देओलने 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 12 धावा जमवल्या. गुजरात जायंट्सच्या डावात 5 षटकार आणि 25 चौकार नोंदवले गेले. वुलव्हर्ट आणि मेघना यांनी दुसऱ्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. मेघना बाद झाल्यानंतर वुलव्हर्टने गार्डनर समवेत तिसऱ्या गड्यासाठी 52 धावांची भर घातली. बेंगळूरतर्फे श्रेयांका पाटीलने 17 धावात 2 तर डिव्हाईन आणि बोस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पहिल्या चेंडूपासूनच रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरची सलामीची जोडी कर्णधार मानधना आणि डिव्हाईन यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या जोडीने 9.2 षटकात 125 धावांची शतकी भागीदारी केली. राणाने स्वत:च्याच गोलंदाजीवर मानधनाला टिपले. तिने 31 चेंडूत 1 षटकार 5 चौकारासह 37 धावा जमवल्या. मानधना बाद झाल्यानंतर डिव्हाईनला पेरीने बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 32 धावांची भर घातली. डिव्हाईनने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. तिने आपल्या 36 चेंडूतील 99 धावांच्या खेळीमध्ये 8 उत्तुंग षटकार आणि 9 चौकार ठोकले. कर्णधार मानधनाने डावातील पहिल्याच षटकात कंवरच्या गोलंदाजीवर 1 षटकार आणि 2 चौकारासह 18 धावा घेतल्या होत्या. डिव्हाईनने या स्पर्धेतील सर्वात लांब म्हणजे 94 मीटरचा षटकार खेचला. डिव्हाईन शतक पूर्ण करेल असे वाटत असताना ती 12 व्या षटकात गॅरेथच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. बेंगळूर संघाला यावेळी विजयासाठी 32 धावांची जरुरी होती. पेरी आणि नाईट यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. पेरीने 12 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 19 तर नाईटने 15 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 22 धावा जमवल्या. दोन्ही संघांकडून या सामन्यात तुफान फटकेबाजी पाहावयास मिळाल्याने प्रेक्षक खूष झाले. बेंगळूरचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. बेंगळूर संघाच्या डावामध्ये 9 षटकार आणि 21 चौकार नोंदवले गेले. गुजरात जायंटसतर्फे गॅरेथ आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स 20 षटकात 4 बाद 188 (वुलव्हर्ट 68, डंक्ले 16, मेघना 31, गार्डनर 41, हेमलता नाबाद 16, देओल नाबाद 12, श्रेयांका पाटील 2-17, डिव्हाईन 1-23, बोस 1-23), रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 15.3 षटकात 2 बाद 189 (स्मृती मानधना 37, सोफी डिव्हाईन 99, पेरी नाबाद 19, नाबाद 22, अवांतर 12, गॅरेथ 1-32, स्नेह राणा 1-25).









