क्षितीज पटेलचे शतक हुकले, कौशिकचे 4 बळी
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर बीसीसीआय आयोजित आयडीएफसी फर्स्ट बॅक रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी गुजरात संघ पहिल्या डाव 264 धावांत गारद झाल . क्षितीज पटेलचे शतक हुकले. कर्नाटकाच्या कौशिक व्ही. ने 4 गडी बाद केले. बेळगावच्या सुजय सातेरीने पदार्पण सामन्यात 3 अप्रतिम झेल टिपले.
नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळविण्यात आलेल्या रणजी सामन्यात कर्नाटक संघाने नाणेफेक जिंकून गुजरात संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने 88 षटकात सर्व गडी बाद 264 धावा केल्या. त्यात क्षितीज पटेलने 11 चौकारांसह 95 धावा केल्या. त्याचे शतक केवळ 5 धावांनी हुकले. उमंगने 12 चौकारांसह 72, कर्णधार सी. टी. गाजाने 3 षटकार व 1 चौकारासह 45 तर प्रियांक पांचाळने 5 चौकारांसह 24 धावा केल्या. क्षितीज व उमंग या जोडीने 5 गड्यांसाठी 157 धावांची भागिदारी केली. कर्नाटकतर्फे कौशिक व्ही. ने 49 धावांत 4, व्ही. वैषाकने 42 धावात 2, एम. प्रसिद्धकृष्णाने 62 धावांत 2 तर रोहितकुमार एसी. ने 70 धावांत 2 गडी बाद केले.
पदार्पण सामन्यात सुजयचे तीन अप्रतीम झेल
गुजरात येथे शुक्रवारपासून सुरु झालेल्या कर्नाटक-गुजरात रणजी सामन्यात बेळगावच्या सुजय सातेरीने पदार्पण केले. या सामन्यात ज्येष्ठ कसोटीपटू मयांक अग्रवाल यांच्या हस्ते कॅप देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. या सामन्यात सुजयने हिंगराज, क्षितीज, वाघेला या तीघांचे अप्रतिम झेल टिपले.









