आरसीबीलाही नमवले, 6 गडी राखून एकतर्फी विजय
मुंबई/ वृत्तसंस्था
गुजरात टायटन्सचा यंदाच्या आयपीएल हंगामातील विजयी धडाका शनिवारीही कायम राहिला असून येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांनी आरसीबीला 6 गडी राखून नमवले. वास्तविक, विराट कोहलीला सूर सापडल्यानंतर आरसीबीने 20 षटकात 6 बाद 170 धावांची मजल जरुर गाठली. पण, प्रत्युत्तरात गुजरातने देखील तोडीस तोड फलंदाजी साकारत 19.3 षटकात 4 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले. राहुल तेवातिया (नाबाद 43), डेव्हिड मिलर (नाबाद 39) यांची फटकेबाजी गुजरातसाठी निर्णायक ठरली. या विजयासह गुजरातने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे.
सातत्याने अपयशी ठरत आलेल्या विराट कोहलीने येथे 14 सामन्यानंतर (या हंगामातील 9 सामन्यांसह) पहिलेच आयपीएल अर्धशतक साजरे केले. पण, त्याची ही खेळी विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.
गुजरातचा संघही येथे 13 व्या षटकात 4 बाद 95 असे एकवेळ अडचणीत होता. पण, तेवातिया व मिलर यांच्या फटकेबाजीनंतर आरसीबीच्या आशाअपेक्षा मावळल्या. टेबलटॉपर्स गुजरातचा संघ आता प्ले-ऑफसाठी 16 गुणांच्या मॅजिक मार्कवर पोहोचला आहे.
शनिवारी, कोहलीने 53 चेंडूत 58 धावांची बहारदार खेळी साकारली आणि तो बाद होऊन परतत असताना ब्रेबॉर्न स्टेडियमवरील चाहत्यांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली. रजत पाटीदारने 32 चेंडूत 52 धावांसह आपले पहिले आयपीएल अर्धशतक साजरे केले. याशिवाय, ग्लेन मॅक्सवेलने 18 चेंडूत 33 धावांची आतषबाजी केली. प्रदीप संगवानने 19 धावात 2 बळी घेतले तर रशिद खानने 4 षटकात केवळ 29 धावा दिल्या.
गुजरातची खराब सुरुवात
विजयासाठी 171 धावांचे आव्हान असताना साहा (29) व शुभमन (31) यांनी 7.3 षटकात 51 धावांची सलामी दिली. डावखुरा फिरकीपटू शाहबाजने गिलला पायचीत केले तर कर्णधार हार्दिक पंडय़ा (3) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. साई सुदर्शनने 14 चेंडूत 20 धावा केल्या. हसरंगाने त्याला बदली यष्टीरक्षक अनुज रावतकरवी त्याला झेलबाद केले. दिनेश कार्तिक यावेळी मैदानात उतरु शकला नाही.
सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातची 4 बाद 95 अशी स्थिती होती. 71 धावांची आवश्यकता असताना मिलरने हसरंगाच्या षटकात 13 तर राहुल तेवातियाने सिराजच्या षटकात 15 धावांची आतषबाजी केली आणि हा सामना गुजरातच्या बाजूने झुकला. हर्षलने 17 वे षटक किफायतशीर टाकले. पण, तेवातियाने हॅझलवूडला फाईन लेगकडे षटकारासाठी फ्लिक केल्यानंतर आणखी दोन चौकार वसूल केले गेले आणि पाहता पाहता गुजरातच्या सहज विजयावर शिक्कामोर्तब झाले.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी ः 20 षटकात 6 बाद 170 (विराट कोहली 53 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 58, रजत पाटीदार 32 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 52, ग्लेन मॅक्सवेल 18 चेंडूत 33, महिपाल लोमरोर 8 चेंडूत 16. अवांतर 7. प्रदीप संगवान 2-19, अल्झारी जोसेफ, रशिद खान, लॉकी फर्ग्युसन प्रत्येकी 1 बळी).
गुजरात टायटन्स ः 19.3 षटकात 4 बाद 174 (राहुल तेवातिया 25 चेंडूत नाबाद 43, डेव्हिड मिलर 24 चेंडूत नाबाद 39, साई सुदर्शन 14 चेंडूत 20, शुभमन गिल 28 चेंडूत 31, साहा 22 चेंडूत 29. अवांतर 9. शाहबाज अहमद 2-26, वणिंदू हसरंगा 2-28).
राहुल तेवातिया गुजरातचा हंगामातील सातवा सामनावीर!
अवघ्या 25 चेंडूत 43 धावांची आतषबाजी करणारा राहुल तेवातिया गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला आणि याहून महत्त्वाचे म्हणजे या हंगामात सामनावीर पुरस्कार जिंकणारा गुजरातचा चक्क सातवा खेळाडू ठरला. या संघातर्फे लखनौविरुद्ध मोहम्मद शमी, दिल्लीविरुद्ध लॉकी फर्ग्युसन, पंजाबविरुद्ध शुभमन गिल, राजस्थानविरुद्ध हार्दिक पंडय़ा, चेन्नईविरुद्ध डेव्हिड मिलर, कोलकाताविरुद्ध रशिद खान हे गुजरातचे खेळाडू यापूर्वी सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. अशा एकापेक्षा एक मॅचविनर्समुळे गुजरात कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणाने बडे आव्हान उभे करण्याची ताकद राखून आहे.









