चोवीस तासात 12 बळी : सात जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती
वृत्तसंस्था / अहमदाबाद
बिपरजॉय चक्रीवादळाच्या आव्हानाचा सामना केल्यानंतर गुजरातमध्ये मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. राज्यातील कच्छ, गांधीधाम, जामनगर आणि जुनागडमध्ये मुसळधार पावसानंतर अनेक गावांचा संपर्क तुटला. पुरामुळे रहिवासी भागात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले होते. सततच्या पावसामुळे जुनागडमध्ये सर्वाधिक बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गीर जंगल आणि काही डोंगराळ भागात पावसामुळे कळवा आणि ओजल नद्यांना पूर आला आहे. कच्छ जिह्यातील गांधीधाम येथील रेल्वेस्थानकालाही पाण्याचा तडाखा बसला असून स्थानकात पाणी शिरले आहे. राज्यात गेल्या चोवीस तासात मुसळधार पावसात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कच्छ, जामनगर, जुनागढ, नवसारी, वलसाड, राजकोट, बोटाद, अमेरली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याचे हवामान विभागाने रविवारी सांगितले. कच्छमध्ये 239 मिमी, जामनगरमध्ये 269 आणि जुनागडमध्ये 398 मिमी पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अहमदाबादमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पाच अंडरपास मार्ग बंद करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी गांधीनगर येथील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहोचून रात्री उशिरा तातडीची बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एनडीआरएफला पाऊसग्रस्त भागात मदतीसाठी पाठवले आहे.
जुनागडमध्ये 20 गावांचा संपर्क तुटला
पूरस्थिती आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे वेगवेगळ्या भागात 20 गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सौराष्ट्रात पाऊस पडत आहे, मात्र जुनागड जिह्यातील विसावदरमध्ये सर्वात भीषण परिस्थिती आहे. नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांचे बंधारे फुटल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मानवदर, केशोद, मंगरूळसह ग्रामीण भागात पाणी तुंबण्याची परिस्थिती आहे.









