वृत्तसंस्था/ कटक
अल्टिमेट खोखो स्पर्धेत गुजरात जायंट्स आणि चेन्नई क्विक गन्स यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. या स्पर्धेतील उपांत्य लढतीत गुजरात जायंट्सने विद्यमान विजेत्या ओदिशा जॉगरनट्सचा 29-27 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.
या उपांत्य सामन्यात गुजरात जायंट्स संघातील सुयश गरगट्टे आणि संकेत कदम यांचा खेळ आकर्षक ठरला. या सामन्यात ओदिशा संघाकडून उत्तरार्धात दर्जेदार खेळ पाहावयास मिळाला. सुयश आणि संकेत यांनी प्रत्येकी 6 गुण मिळवले. हा सामना येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर खेळवण्यात आला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात चेन्नई क्विक गन्सने तेलगू योद्धासचा 31-29 अशा दोन गुणांच्या फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्या अल्टिमेट खोखो स्पर्धेत तेलगू योद्धाजने उपविजेतेपद मिळवले होते. मात्र यावेळी त्यांना उपांत्य फेरी पार करता आली नाही. आता या स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी तेलगू योद्धाज आणि ओडिशा यांच्यात लढत होईल. चेन्नई क्विक गन्सच्या प्रतिक वायकरला सर्वोत्तम आक्रमक खेळाडूचा पुरस्कार मिळाला. त्याने या सामन्यात सर्वाधिक म्हणजे 14 गुण मिळवले.









