भूपेंद्र सिंह रावत सरकारमधील सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे : नव्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी
खांदेपालट…
- नवीन मंत्रिमंडळ आज सकाळी 11:30 वाजता शपथ घेणार
- नवीन चेहऱ्यांना संधी, दोन उपमुख्यमंत्री नेमण्याची शक्यता
- केंद्रीय पातळीवरून आलेल्या निर्देशानुसार फेरबदल अपेक्षित
वृत्तसंस्था/गांधीनगर
राज्यात मंत्रिमंडळ पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री वगळता गुजरात सरकारच्या सर्व मंत्र्यांनी गुरुवारी राजीनामे सादर केले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मंत्र्यांचे राजीनामे राज्यपालांकडे पाठवले असून नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता गांधीनगर येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय पक्षनेतृत्त्वाकडून आलेल्या निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आले असून आता नव्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे संकेत राजकीय पातळीवरून मिळत आहेत. गुजरातच्या नवीन मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होऊ शकते. तसेच मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आमदारदेखील मंत्री होऊ शकतात. सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 17 मंत्री होते. यामध्ये आठ कॅबिनेट दर्जाचे आणि आठ राज्यमंत्री होते. आता नवीन मंत्रिमंडळाची ओळख शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे.
गुजरात विधानसभेत 182 आमदार आहेत. परिणामी, गुजरात सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 27 मंत्री असू शकतात. कॅबिनेट पदासाठी पात्र असलेल्या आमदारांना फोनवरून कळवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा शपथविधी समारंभाला उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी रात्रीच गुजरातला पोहोचले आहेत. तर, न•ा शुक्रवारी सकाळी राज्यात दाखल होतील. राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सल हेसुद्धा गुजरातमध्ये दाखल झाले असून त्यांची मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या दरम्यान, मंत्र्यांनी राजीनामे दिल्यासंबंधीची माहिती राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. राजीनाम्यांसोबतच संभाव्य नवीन मंत्र्यांची यादी राज्यपालांना सादर केल्याचेही समजते. अंतिम यादी शपथविधीपूर्वी राज्यपाल कार्यालयाला पोहोचवली जाणार आहे.
काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना मंत्रिपद शक्य
नवीन मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांपैकी 7-10 मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, तर 3-5 मंत्र्यांचे स्थान कायम राहू शकते. नवीन चेहऱ्यांमध्ये, काँग्रेसमधून सामील झालेले अर्जुन मोढवाडिया, अल्पेश ठाकोर, सी. जे. चावडा आणि हार्दिक पटेल यांना संधी मिळू शकते. सौराष्ट्रातील जयेश राडाडिया आणि जितू वाघानी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. उत्तर गुजरातमधील पाटीदार आणि ठाकोर समुदायाकडे विशेष लक्ष दिले जाईल. याशिवाय, मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, पंचायत मंत्री बच्चूभाई खबर, वन व पर्यावरण मंत्री मुकेश पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री भिखुसिंह परमार आणि आदिवासी विकास मंत्री कुंवरजी हलपती या राज्यमंत्र्यांना वगळण्याची शक्यता आहे.









