ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात गुजरात एटीएसला यश आले आहे. अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, हे चारही आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक आहेत. (Gujarat ATS arrested four accused in the 1993 Bombay serial blasts case)
1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. या बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकरकला तब्बल 29 वर्षांनी संयुक्त अरब अमिरातमधून अटक करण्यात यश मिळालं होतं. यानंतर आता गुजरात एटीएसने अहमदाबादमधून या चार आरोपींना अटक केली. बॉम्बस्फोटानंतर हे चारही आरोपी परदेशात पळून गेले होते. हे आरोपी बनावट पासपोर्टच्या आधारे अहमदाबादमध्ये आले होते. या संदर्भात गुजरात एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
देशातील सर्वात मोठा बॉम्बस्फोट म्हणून मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट ओळखला जातो. यामध्ये एकूण 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.