दंड-बैठका हा अगदी प्राचीन व्यायाम प्रकार आहे. अनेक पुरातन ग्रंथांमध्येही त्यांचा उल्लेख सापडतो. पंजाबचा नागरीक कुंवर अमृतबीरसिंग यांने याच दंड मारण्याच्या व्यायाम प्रकारात दोनदा विक्रम करुन दोन्ही वेळा स्वत:चे नाव गिनिज विक्रम पुस्तिकेत नोंद केले आहे. त्याचे वैशिष्ट्या असे की तो हातांचे तळवे जमिनीवर पूर्ण टेकवून दंड काढत नाही, तर केवळ हातांची बोटे जमिनीवर टेकवून काढतो. असे दंड काढणे जास्त अवघड असते.
अमृतबीरसिंग हा पंजाबच्या बटाला शहराच्या उमरवाला भागात राहतो. त्याचे वय 21 वर्षांचे आहे. तो कधीही व्यायामशाळेत किंवा जिममध्ये गेलेला नाही. तसेच तो शक्तीवर्धनासाठी कोणताही प्रथिनयुक्त पूरक आहार किंवा प्रोटीन सप्लिमेंटस् घेत नाही. नेहमी तो जे अन्न घरात खातो त्यावरच त्याने आपली व्यायाम साधना केली आहे. काही वर्षांपूर्वी त्याने दंड मारण्याचा विक्रम करुन स्वत:चे नाव गिनिज विक्रमपुस्तिकेत नोंद केले होतेच. आता त्याने पाठीवर 20 पौंडाचे (जवळपास 10 किलो) वजन ठेवून एका मिनिटात 86 दंड काढले आहेत. असे करणारा तो जगातील पहिलाच ‘दंडवीर’ आहे, असा उल्लेख गिनिज विक्रमपुस्तिकेत करण्यात आला आहे. त्याची स्वत:ची युट्यूब वाहिनी आहे. तिच्यावरुन तो जिममधील महागड्या उपकरणांचा उपयोग न करता उत्कृष्ट व्यायाम कसा करता येतो याची प्रात्यक्षिके दाखवितो. इन्स्टाग्रामवर त्याचे 2 लाख फॉलोअर्स आहेत. कमी खर्चाच्या पण प्रभावी व्यायामासंबंधी त्याची ख्याती आहे.









