प्रत्येक घरामध्ये रवींद्र चव्हाण गेली 30 वर्षे विविध कामे करत आहेत
By : इम्तियाज मुजावर
सातारा (वडाचे म्हसवे) : वयाच्या 70 व्या वर्षीही गावातल्या प्रत्येक घरात न थकता सेवा करणारे हरकाम्या रवींद्र चव्हाण यांना आता हक्काचा आर्थिक आधार हवा आहे. गेली 30 ते 35 वर्षं ते आपल्या गावात कोणत्याही मोबदल्याशिवाय सेवा देत आहेत. तेही फक्त एका वेळच्या जेवणाच्या बदल्यात.
सातारा-पणे महामार्गापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेलं वडाचे म्हसवे हे गाव वैराटगडाच्या पायथ्याशी वसलेलं आहे. गावात सुमारे 1500 लोकसंख्या असून 200 घरं आहेत. या प्रत्येक घरामध्ये रवींद्र चव्हाण गेली तीन दशके विविध कामं करत आहेत.
किराणामाल आणणं, औषध घेऊन येणं, ओझी उचलणं, घरातली लहानसहान कामं, कोणतंही काम न म्हणणारा ‘हरकाम्या’ म्हणून ते आज संपूर्ण गावात ओळखले जातात. त्यांच्या कामाचा मोबदला काय? तर फक्त एक वेळचं जेवण. सकाळी एका घरात, दुपारी दुसऱ्या, तर रात्री आणखी एका घरात अशारीतीने ते दिवस काढतात. त्यांनी आजवर कधीही पैशाचा आग्रह धरलेला नाही.
“माझं उद्दिष्ट एकच आहे, जास्तीत जास्त घरात जेवून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मिळवायचं’, असं ते अभिमानाने सांगतात. गावातील प्रत्येक घराच्या गरजांची यादी त्यांच्या हातात असते. कोणत्या घरात कोणतं काम करायचं, कोणत्या सुगरणीच्या हातचं जेवण मिळणार आहे, याची त्यांना अचूक माहिती आहे. गावातल्या माणसांसाठी ते केवळ ‘हरकाम्या’ नाहीत, तर घरचा सदस्य आहेत.
संजय गांधी निराधार योजना तसेच अन्य शासकीय योजनांसाठी अर्ज केले आहेत. मात्र आजपर्यंत कोणतीच योजना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्यांचे कुणी नातेवाईक किंवाआप्त नाही.रवींद्र चव्हाण हे पूर्णतः गावावर अवलंबून आहेत. आता वयाचा भार वाढतोय, शरीर थकतंय, आणि म्हणूनच त्यांना हक्काचा महिन्याला नियमित आर्थिक आधार हवा आहे.
सत्ताधाऱ्यांनो, प्रशासनांनो हा आवाज ऐका!
रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या निस्वार्थ सेवेच्या प्रतीक ठरलेल्या व्यक्तीला जर शासनाने आधार दिला नाही, तर त्याहून मोठं दुर्भाग्य कोणतं? त्यांनी गावासाठी आयुष्य दिलंय. आता त्यांना हक्काचं सुरक्षित आणि सन्मानाचं जीवन हवं आहे.








