हा इसम वाचला कसा?
मधुमेह झाल्याचे समजताच लोक विविध प्रकारचे उपाय करू लागतात. डॉक्टरांकडे धाव घेतात, औषधांचा वापर सुरू करतात. हाय ब्लडशुकर स्वत:सोबत अनेक प्रकारचे आजार घेऊन येत असतो. परंतु जगात एक असा मुलगा आहे ज्याची ब्लडशुगर सामान्यापेक्षा 21 पट अधिक आहे, हा एक विक्रम असून त्याची गिनिज बुकमध्ये नोंद देखील झाली आहे. म्हणजेच जगात अन्य कुठल्याही व्यक्तीची ब्लडशुगर इतकी अधिक नाही. तरीही हा मुलगा सामान्य जीवन जगत असल्याचे पाहून डॉक्टरही चकित झाले आहेत.
न्यू जर्सी येथे राहणारा मायकल पॅट्रिक बुओनोकोर 6 वर्षांचा असताना त्याची ब्लडशुगर सामान्य पातळीपेक्षा 21 पट अधिकपर्यंत वाढली होती. त्याची ब्लड शुगर 2,656 पर्यंत पोहोचली होती. डॉक्टरांनुसार 500 हून अधिक ब्लडशुगरच आयुष्य समाप्त करण्यास पुरेसे आहे. परंतु हा मुलगा आजही जिवंत आहे.

126 किंवा त्याहून कमी रक्तशर्करा सामान्य मानली जाते. रक्तशर्करा 500 पर्यंत पोहोचल्यास कोमामध्ये जाण्याची जोखीम तयार होत असते. परंतु मायकलला कुठलाच त्रास झालेला नाही. मायकल आता 21 वर्षांचा आहे. पेंसिल्वेनियात सुटी घालवत असताना अचानक मला सर्दी झाली होती. तर तीन दिवसांनी माझी प्रकृती खूपच बिघडली, मदतीशिवाय मला चालता देखील येत नव्हते असे मायकलने सांगितले आहे.

आईवडिलांनी त्याला त्वरित रुग्णालयात नेले होते, परंतु वाटेतच तो बेशुद्ध झाला होता. शुद्ध येईपर्यंत त्याला औषधे देण्यात आली नव्हती. 2 आठवड्यांपर्यंत त्याला रुग्णालयात रहावे लागले होते. त्याची ब्लडशुगर लेव्हल खूपच वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर कुटुंबीयांना धक्काच बसला होता. मायकलला टाइप-1 मधुमेहाची समस्या होती. मला आता इन्सुलिन घ्यावे लागते, रक्तशर्करा खूपच अधिक वाढल्यावर मला चालताना-फिरताना वेदना होऊ लागतात असे मायकलने सांगितले आहे.









