राज्य आरोग्य खात्याकडून जनतेला आवाहन : राज्य सरकार अलर्ट
प्रतिनिधी/ बेंगळूर
मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भेसळयुक्त कफ सिरपमुळे 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट झाले आहे. दोन वर्षाखालील मुलांना सर्दी व खोकल्यावरील सिरप देऊ नयेत, असे निर्देश केंद्र सरकारने नुकताच दिले आहेत. आता राज्य सरकारनेही कफ सिरपसंबंधी जनतेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
मध्यप्रदेश व राजस्थानमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकताच दोन सिरपच्या खरेदी व विक्रीवर निर्बंध घातले आहेत. त्या पाठोपाठ आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गसूची तयार करण्यात आली आहे. दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नये, 2 ते 5 वर्षांच्या मुलांना तज्ञांचा सल्ल्यानुसारच औषधे द्यावीत, 5 वर्षांवरील मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे द्यावीत, कमी कालावधीसाठी आवश्यक असलेला कमीत कमी डोस घ्यावा, मल्टीमेडिसिन असलेले सिरप वापरू नयेत, असा उल्लेख मार्गसूचीमध्ये करण्यात आला आहे.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्यावरील सिरप खरेदी करू नयेत किंवा वापरू नयेत, पूर्वी वापरलेली औषधे पुन्हा वापरू नयेत, खोकला वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, औषधे कालबाह्या झाली आहेत का हे तपासून वापरावीत, असामान्य झोपेत उलटी किंवा श्वसन करण्यात अडथळे येत असतील तर नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, औषधाची एक्स्पायरी डेट तपासण्याचा आणि त्यावरील लेबल काळजीपूर्वक वाचण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
राज्यात निकृष्ट औषधांचा पुरवठा नाही : गुंडूराव
राज्यातील सर्व कंपन्यांकडून कफ सिरपचे नमुने गोळा केले जात आहेत. त्यांची लॅबमध्ये तपासणी करण्यान येत आहे. कर्नाटकात भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे कोणीही घाबरण्याची गरज नाही. परंतु, पालकांनी 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्याही प्रकारचे सिरप देताना अत्यंत खबरदारी बाळगावी, असे आवाहन आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केले आहे.
काय आहेत मार्गदर्शक तत्वे?
► 2 वर्षांखालील मुलांना खोकला किंवा सर्दीवरील सिरप देऊ नये.
► 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना योग्य वैद्यकीय तपासणीनंतरच तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे द्यावीत.
► कमीत कमी कालावधीसाठी आवश्यक असलेला किमान डोस द्यावा. मल्टीमेडिसिन असलेले सिरप वापरू नयेत.
► सुरक्षित घरगुती उपाय करा, मुलांना भरपूर द्रवपदार्थ द्या. त्यांना विश्रांती आणि पुरेशी झोप घेण्याची सोय करावी.
► मुलांना शक्य तितका पौष्टिक आहार द्या. कोणत्याही कारणास्तव स्वत: औषधोपचार करू नका.
► डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय कधीही खोकल्याच्या सिरप खरेदी किंवा वापरू नका.
► पूर्वी वापरलेली किंवा इतरांच्या शिफारसीवरून कोणतीही औषधे वापरणे थांबवा.
► मुलांमध्ये कोणतीही असामान्य प्रतिक्रिया झोप, उलट्या किंवा श्वसन करण्यात अडथळे असल्यास, त्यांना त्वरित जवळच्या तज्ञ डॉक्टरांना दाखविणे
► औषधाची एक्सपायरी डेट तपासणे, लेबल्स काळजीपूर्वक वाचणे.









