ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्याची सूचना : विमानात पहिल्या रांगेत सीट, उद्घोषणा आवश्यक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मानवी अवयवांच्या वाहतुकीवरून पहिल्यांदाच दिशानिर्देश जारी केले आहेत. परिवहनाच्या विविध माध्यमांमधून मानवी अवयवांना कुठल्याही अडथळ्याशिवाय सहजपणे संबंधित रुग्णालयांपर्यंत पोहोचविता यावे याकरता हे दिशानिर्देश लागू करण्यात आले आहेत. अवयव नेणाऱ्या एअरलाइन्सला टेक-ऑफ आणि लँडिंगसाठी प्राथमिकता देण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलला विनंती करणे आणि समोरच्या रांगेतील सीट्सची व्यवस्था करण्याचा मुद्दा दिशानिर्देशात सामील आहे.
देशात अवयवदानाची मोठी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. स्पेन, अमेरिका आणि चीन यासारखे अनेक देश अवयवदानात खूपच पुढे आहेत. परंतु भारताने देखील अलिकडच्या काळात या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. प्रत्यारोपित होण्यापूर्वी कुठलाही अवयव निकामी होऊ नये यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचा निर्देश सरकारने अधिकाऱ्यांना दिला आहे.
अवयव वाहतूक प्रक्रियेला सुव्यवस्थित करत मूल्यवान अवयवांचा उपयोग कमाल करणे आणि जीवनरक्षक प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करत असलेल्या रुग्णांना आशा प्रदान करणे हे सरकारचे लक्ष्य आहे. हे दिशानिर्देश देशभरातील अवयव प्रत्यारोपण संस्थांसाठी एक रोडमॅप असतील. अवयवदाता आणि अवयव प्राप्तकर्ता दोघेही एकाच शहरातील किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये असल्यास अवयव वाहतुकीची गरज भासते. ब्रेन डेड व्यक्ती असल्यास 12 तासांमध्ये अवयव काढावे लागतात आणि प्रत्यारोपणी कमी वेळेत करावे लागते. याचमुळे प्रणालीत सुधारणा करावी लागणार असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटले आहे.
विमानाचा कॅप्टन उ•ाणादरम्यान मानवी अवयवांना नेण्यात येत असल्याची घोषणा करू शकतो असे दिशानिर्देशात नमूद आहे. विमानतळ किंवा एअरलाइन्स कर्मचाऱ्यांकडून आगमनानंतर विमानातून रुग्णवाहिकेपर्यंत अवयव बॉक्स नेण्यासाठी ट्रॉलींची व्यवस्था केली जाऊ शकते. प्रत्येक राज्य आणि शहरात अवयव परिवहनासाठी ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्याशी संबंधित मुद्द्यांना हाताळण्यासाठी पोलीस विभागाकडून एक नोडल अधिकारी नियुक्त केला जाऊ शकते.









