लघुउद्योजक संघटनेतर्फे आयोजन
बेळगाव : बेळगाव जिल्हा लघुउद्योग संघटना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय व लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने’विषयी माहिती देण्यात आली. उद्यमबाग येथील लघुउद्योग संघटनेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हुबळी येथील इपीएफओचे विभागीय अधिकारी रमकेश मिना, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण भट, कामगार उपायुक्त नागेश डीजी, जिल्हा रोजगार केंद्राचे साहाय्यक संचालक गुरुपदय्या हिरेमठ, उद्योजक सचिन सबनीस उपस्थित होते.
1 जुलैपासून भारत सरकारने प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू केली. रोजगार निर्मितीला चालना देऊन कामगारांमध्ये रोजगार क्षमता वाढविणे व सामाजिक सुरक्षा प्रदान करणे, असा या योजनेचा उद्देश असल्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले. यावेळी बोलताना उद्योजक सचिन सबनीस यांनी योजनेची माहिती सर्वांसमोर मांडली. इपीएफओ बेळगावचे अधिकारी महेश जिंदे यांनी या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती दिली. औद्योगिक क्षेत्राला कौशल्यपूर्ण कामगारांची आवश्यकता असल्याने ही योजना महत्त्वाची ठरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी वैभव यादव यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत पाटील यांनी आभार मानले.









