हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रेची दिली माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक प्रा. संभाजीराव भिडे गुरुजींचे बेळगावात व्याख्यान झाले. बुधवार दि. 19 जुलै रोजी मराठा मंदिर येथे झालेल्या व्याख्यानात गुरुजींनी तब्बल साडेतीन तास शिवभक्तांना मार्गदर्शन केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या ‘हिंदवी स्वराज्य : स्वातंत्र्य दिन पदयात्रा’ या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी गुरुजी बेळगावला आले होते. सुवासिनींनी औक्षण करून गुरुजींचे स्वागत केले. धारकऱ्यांच्यावतीनेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर गुरुजींच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन करून प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर व्याख्यानाला सुरुवात झाली.
शिवभक्तांना मार्गदर्शन करताना संभाजीराव भिडे गुरुजींनी अनेक ऐतिहासिक दाखले देत शिवाजी महाराज कसे घडले? आणि रामायण, महाभारत यांचा प्रभाव महाराजांवर कसा होता? याची माहिती दिली. याबरोबरच ब्रिटिशांनी भारतीयांना कशा पद्धतीने पारतंत्र्यात लोटले? त्याची कारणे काय आहेत? त्याला कारणीभूत कोण? याविषयीही मार्गदर्शन करतानाच देशाचा राष्ट्रध्वज हा भगवाच असला पाहिजे, या ठरावाचीही जाणीव करून दिली. यावेळी रुद्रकेसरी मठाचे श्री हरिगुरु महाराज, शिवप्रतिष्ठानचे प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख आनंद चौगुले, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांच्यासह धारकरी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर विविध तालुकाप्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडली. पुढील वाटचालीबद्दल गुरुजींनी मार्गदर्शन केले.









