गुहागर / सत्यवान घाडे :
गुहागर नगरपंचायत हद्दीत प्रवेश करणारे तालुक्याबाहेरील रहिवासी व पर्यटकांच्या वाहनांवर प्रवेश शुल्क म्हणजेच पर्यटन कर आकारण्याबाबतचा प्रस्ताव गुहागर नगर पंचायतीने तयार केला आहे. नागरिकांच्या माहितीकरीता तसेच त्यावर सूचना व हरकतींसाठी याबाबतचा मसुदा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नव्या धोरणाची अंमलबजावणी गुहागर शहरामध्ये कशा प्रकारे होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांना सूचना व हरकतीसाठी 29 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्ती व वाहनांवर हा कर आकारण्यात येणार आहे. मात्र यामध्ये 0 ते 5 वयोगटातील मुले व 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व शासकीय वाहने, शासकीय कर्मचारी, गुहागर तालुक्यातील वाहने व नागरिक यांना या करातून सूट आहे. मात्र अशा नागरिकांनी शहरात प्रवेश करताना कर वसुली अधिकारी, कर्मचारी यांना गाडीचे आरसी बुक, आधार कार्ड किंवा तत्सम दस्त दाखवणे बंधनकारक राहणार आहे.
- कसे आहेत प्रस्तावित दर?
ही कर आकारणी सादर करताना सहा ते बारा वर्षापर्यंतची मुले आणि दहावीपर्यंतच्या शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून 15 रुपये, 13 ते 70 वर्षापर्यंतच्या प्रत्येक प्रवाशासाठी 30 रुपये, इलेक्ट्रीक व सीएनजी दुचाकीसाठी 10 ऊपये, पेट्रोल व डिझेल दुचाकीसाठी 20 ऊपये, इलेक्ट्रीक सीएनजी 10 आसन क्षमता असलेल्या चार चाकीसाठी 30 ऊपये, पेट्रोल व डिझेल 10 आसन क्षमता असलेल्या चार चाकीसाठी 40 ऊपये, इलेक्ट्रिक सीएनजी 11 पेक्षा जास्त क्षमता असलेल्या चार चाकीसाठी 50 ऊपये, पेट्रोल व डिझेलवरील 11 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेल्या चार चाकीसाठी 60 ऊपये, इलेक्ट्रिक व सीएनजी बससाठी 70 ऊपये, पेट्रोल व डिझेल बससाठी 80 ऊपये असे प्रवेश शुल्क प्रस्तावित आहे.
- सूचना व हरकतींसाठी आवाहन
दरम्यान, या मसुद्यावर सूचना व हरकती मागवण्यात आले असून त्यानंतर यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी दिली. या कर वसुलीस शासनाने मंजुरी दिल्यानंतर 60 दिवसात तो लागू केला जाणार आहे. सदर वसुली करण्याकरीता नगरपंचायतीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे नगर पंचायत निविदा काढून निविदेतील उच्चतम दर देणाऱ्या निविदा धारकामार्फत दैनंदिन वसुली करणार आहे. तर हा वसूल केलेला कर नगर पंचायत फंडामध्ये जमा केला जाणार आहे.
- पर्यटकांना सोयी–सुविधाही द्याव्या लागतील
दरम्यान, गुहागर नगर पंचायतीने आपला महसूल वाढवण्यासाठी तसेच 15 वा वित्त आयोगाचा शेवटचा हप्ता मिळवण्यासाठी पर्यटन कराचा प्रस्ताव तयार केला आहे. नगर पंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टी करामधील 90 टक्के वसुलीबरोबर दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढ होणे आवश्यक असते. मात्र आता कोणत्याही प्रकारची घरपट्टी–पाणीपट्टी वाढ न केल्याने यावर्षीचा पंधरावा वित्त आयोगाचा शेवटचा 80 लाख रुपयांचा निधी मिळणे कठीण झाले आहे. यासाठी नगर पंचायत शहर प्रवेश कराबाबतचा नवीन प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहे. मात्र शहर प्रवेश शुल्क आकारणी बरोबरच येणाऱ्या पर्यटकांच्या सोयी–सुविधांकडे नगर पंचायतीला लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर ‘ब्ल्यू फ्लॅग’ नामांकन प्रस्तावातही पर्यटन कराचा अंतर्भाव आहे. त्यामुळे गुहागर नगर पंचायत महाबळेश्वर, पाचगणीप्रमाणे पर्यटकांच्या वाहनांवर प्रवेश शुल्क आकारण्याचे धोरण निश्चित करत आहे.








