गुहागर / सत्यवान घाडे :
गुहागरच्या पर्यटन वाढीसाठी नगरपंचायतीकडे निधी असणे आवश्यक आहे. जो निधी मिळतो, यामध्ये पर्यटनवाढीसाठी ठोस कामे होत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकनासाठी व त्यातून शहरातील पर्यटन विकास निधी मिळविण्याचा प्रयत्न गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी सुरू केला आहे. गुहागर नगरपंचायतीकडून ‘ब्ल्यु फ्लॅग’ मानांकनासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षात पर्यटनदृष्ट्या ठोस कामे झालेली दिसून येत नाहीत. याअगोदर उभारण्यात आलेली फ्लोटींग जेटी, सीव्ह्यु गॅलरी, मुलांच्या खेळाचे साहित्य, नाना–नानी पार्क यासांरखे समुद्रकिनारी असलेले उपक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. विकासाला साथ देण्यापेक्षा हरितलवादाकडे सीआरझेडच्या एका तक्रारीवर फ्लोटींग जेटी व सीव्ह्यु गॅलरी काढण्याची नामुष्की प्रशासनावर आली. तर नाना–नानी पार्क, नक्षत्रवनाच्या संवर्धनासाठी निधीची कायमस्वरुपी तरतूद न केल्याने सर्व पार्क व नक्षत्रवन सुकून नष्ट झाले. यामुळे केवळ सुरूबन व समुद्रचौपाटी पहावयास मिळते. आजही फ्लोटींग जेटी पूर्णपणे न काढल्याने तिचे दिसणारे अवशेष खुंटलेल्या पर्यटनाची साक्ष देतात. मात्र तरीही गुहागरला लाभलेल्या स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटकांचा मोठा ओढा गुहागरकडे आहे. येथे स्वच्छ व सुंदरतेबरोबरच शांतता मिळते. याचा प्रचार–प्रसारच गुहागरच्या पर्यटनवाढीचे स्त्राsत बनले आहे. मात्र तरीही येणाऱ्या पर्यटकांना प्राथमिक गरजा पुरवणे गरजेचे आहे. या गरजा याचवेळी पुरविल्या नाहीत तर मात्र पर्यटक आपली दिशा बदलू शकतो. मुख्याधिकारी यांनी ब्ल्यु फ्लॅग या आंतरराष्ट्रीय मानांकनासाठीचा प्रस्ताव करून त्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
- काय आहे ब्लूफ्लॅग
या ब्ल्यु फ्लॅग विषयी मुख्याधिकारी चव्हाण म्हणाले, पर्यटन वाढीबरोबर शहराच्या विकासासाठी विविध माध्यमातून निधी मिळविणे आवश्यक आहे. यासाठी ब्ल्यु फ्लॅग या आंतरराष्ट्रीय मानांकनासाठी प्रस्ताव केला आहे. स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यांना या मानांकनासाठी निधी मिळतो. मात्र त्यासाठी आपली मागणी असणे आवश्यक आहे. देशातील 12 समुद्रकिनाऱ्यांना हे मानांकन मिळाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकही समुद्रकिनारा नाही. मात्र यावेळी या मानांकनासाठी महाराष्ट्रातील 5 समुद्रकिनारे निवडण्यात आले असून यामध्ये गुहागर समुद्रकिनाऱ्याचा सामावेश आहे. या मानांकनासाठी कासव संवर्धन, समुद्रकिनाऱ्यावर स्वत:ची 20 हजार क्षमतेची पाणी साठवण टाकी, 20 सेटचे स्वच्छतागृह, समुद्रचौपाटीवर सोलर पॅनलद्वारा पथदीप, अग्नीशमन वाहन आदी 34 प्रमुख मुद्यांवर काम करावे लागेल. यासाठी गुहागर सक्षम आहे. याकरीता 15 कोटीची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
- 27 मार्च रोजी येणार बीच कमिटी
‘ब्ल्यु फ्लॅग’साठी प्रस्तावित केलेल्या विविध 34 प्रमुख मुद्यांवर नगरपंचायत त्या पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. यासाठी काही ठिकाणेही निवडण्यात आली आहेत. विशेषकरून गुहागरचा समुद्रकिनारा हा सहा किलोमीटर विस्तीर्ण असल्याने ही कामे होऊ शकतात. यामुळे याची पाहणी करण्यासाठी ब्ल्यु फ्लॅग बीच कमिटी 27 मार्च रोजी गुहागरला भेट देणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.








