विधानपरिषद सदस्यांनी स्वत: केले प्रथमोपचार : सुवर्णसौध येथील घटना
बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अतिथी प्राध्यापकांच्यावतीने सुवर्णसौध येथे आंदोलन केले जात आहे. मात्र, यावेळी एक आंदोलनकर्ती प्राध्यापिका भोवळ येऊन खाली कोसळल्याने विधान परिषदेचे सदस्य डॉ. धनंजय सर्जी यांनी तिच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी प्राध्यापिकेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सुवर्णसौध येथे सरकारचे विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने विविध संघटनांकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहेत. आंदोलनकर्त्यांसाठी दोन ठिकाणी जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्या ठिकाणी संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी भेट घेऊन निवेदने स्वीकारत आहेत. त्याचप्रमाणे अतिथी प्राध्यापकांचेही सुवर्णसौध येथे आंदोलन सुरू आहे. मानधनात वाढ करावी या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना एक प्राध्यापिका भोवळ येऊन कोसळली. यावेळी उपस्थित विधान परिषदेचे सदस्य डॉ. धनंजय सर्जी यांनी सदर प्राध्यापिकेवर प्रथमोपचार करत अधिक उपचारासाठी जिल्हा ऊग्णालयात दाखल केले. त्यामुळे विधान परिषद सदस्यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल अतिथी प्राध्यापकातून समाधान व्यक्त केले.









