महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यात ‘दैनिक तरुण भारत’ प्रमाणेच ‘दैनिक पुढारी’ हे नाव अग्रभागी आहे. या वृत्तपत्राचा आजचा आत्मा, प्रेरणा, दिशा आणि नेतृत्त्व म्हणजे, डॉ. प्रतापसिंह जाधव. 5 नोव्हेंबर 2025 रोजी ते 80 वर्षांचे होत आहेत. ही केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याची वाटचाल नव्हे, तर महाराष्ट्राच्या निर्भीड, सत्यनिष्ठ आणि मराठी अस्मितेच्या पत्रकारितेची एक तेजस्वी परंपरा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘पुढारी’ने केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर जनमानसाला दिशा दिली. प्रश्न उपस्थित केले आणि न्यायाच्या लढ्यात साथ दिली. ‘तरुण भारत’च्या पावलावर पाऊल ठेवत ‘पुढारी’नेही सीमावासीयांना बळ दिले. सत्य आणि न्यायासाठी निर्भीड आवाज उभारण्याच्या उद्देशाने 1937मध्ये पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी ‘पुढारी’ची स्थापना केली. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील बलिदान आणि नंतर कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादातील दीर्घकाळ चाललेला लढा या सर्व चळवळींमध्ये ‘पुढारी’ने केवळ वार्तांकन केले नाही, तर जनतेच्या भावनांना आकार दिला. त्यांना एकत्र आणण्यासह संघर्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी त्या ध्येयधोरणी परंपरेचा वारसा अधिक दृढ आणि व्यापक केला. ग. गो. जाधवांनी ‘पुढारी’चा पाया रचला, तर डॉ. प्रतापसिंह जाधवांनी त्या विचाराला काळानुरूप नावीन्य, तेज आणि व्यापक व्यासपीठ दिले. 1960च्या दशकापासून पत्रकारिता, संपादक अशा विविध भूमिकांतून त्यांनी बातमीचा मूळ आत्मा जपला. काळानुरूप तिला आधुनिक पत्रकारितेच्या चौकटीत बसवले. ‘दैनिक तरुण भारत’प्रमाणेच सीमा भागातील मराठी मनातील वेदना, त्यांचा संघर्ष, महाराष्ट्राच्या एकीकरणाची आकांक्षा, भाषेचा सन्मान आणि सामाजिक न्याय या सर्व मुद्यांना त्यांनी सतत केंद्रस्थानी ठेवले. विशेष म्हणजे, त्यांनी पत्रकारितेला केवळ वृत्त देण्याचे माध्यम न ठेवता ती सामाजिक जबाबदारीचे शक्तिशाली साधन राहील, याकडे कटाक्ष ठेवला. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादात ‘पुढारी’चे योगदान कोणीही नाकारु शकणार नाही. स्वातंत्र्यानंतर 1956च्या भाषावार प्रांतरचनेत 865 मराठीबहुल गावे कर्नाटकात समाविष्ट झाली. तेव्हापासून मराठी माणसाच्या न्यायासाठी, त्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक हक्कांसाठी हा संघर्ष सुरू आहे. या लढ्यात ‘दैनिक तरुण भारत’प्रमाणेच ‘पुढारी’ ने अग्रलेख, विशेष अंक, परिषदांचे सविस्तर वार्तांकन, संपादकीय मोहिमा आणि जनजागरणाच्या उपक्रमांद्वारे सीमावासीयांचा आवाज केवळ कोल्हापूर-बेळगावपर्यंतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवला. 1986च्या कोल्हापूर सीमा परिषदेत डॉ. जाधवांनी घेतलेली भूमिका अजूनही स्मरणात आहे. त्यांच्या लेखणीने सीमावादाला केवळ राजकीय मुद्दा न ठेवता सांस्कृतिक, भावनिक आणि मानवी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यातून ‘सीमा ही केवळ भौगोलिक रेषा नाही, ती मराठी माणसाच्या हृदयातील भावनेची रेषा आहे’, हा दृष्टिकोन रुजण्यास मदत झाली. ‘पुढारी’च्या संपादकीय पानावरून त्यांनी सतत प्रश्न उपस्थित केला. मराठी माणसाच्या न्यायाला किती दशके थांबावे लागणार? भाषिक अल्पसंख्याक म्हणून त्याला दुय्यम दर्जा का? हे प्रश्न मराठी अस्मितेच्या जागृतीचे आणि संघर्षाचे प्रतीक बनवण्यास डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या लेखणीने हातभार लावला. डॉ. प्रतापसिंह जाधवांची लेखनशैली ही आक्रमकतेसोबतच विवेकपूर्ण आणि तथ्याधारित आहे. ते विरोधकांवर टीका करतात, पण नेहमी मुद्यांवर. सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, पण लोकशाहीवरील विश्वास कधीच ढळू देत नाहीत. ‘पुढारी’च्या अनेक अग्रलेखातून मराठी अस्मिता, राष्ट्रभक्ती, समाजनिष्ठा आणि सत्याची धडाडी प्रकट झाली. त्यांच्यासाठी पत्रकारिता म्हणजे केवळ व्यवसाय नव्हे, तर एक ध्येय, एक व्रत आणि सत्य हेच त्यांचे धर्मस्थान असल्याचे प्रतित होते.
आजही ‘पुढारी’ने स्वतंत्र, निष्पक्ष आणि जनसामान्यांच्या बाजूचे वृत्तपत्र ही ओळख टिकवून धरली आहे. हे संपूर्ण श्रेय डॉ. जाधवांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि विचारशील नेतृत्वाला जाते. डिजिटल युगातही त्यांनी पत्रकारितेला नवी ओळख दिली. विशेषांक, सीमावासीयांच्या मुलाखती, टीव्ही, सामाजिक माध्यमांवर सक्रिय उपस्थिती, जनजागरणाचे व्हिडिओ यांद्वारे त्यांनी पत्रकारितेला पुन्हा लोकांचा आवाज बनवले. 80 व्या वर्षीही डॉ. जाधवांचा उत्साह, ऊर्जा आणि बांधिलकी कमी झालेली नाही. मराठी भाषेचा सन्मान, सहकार चळवळीचे पुनरुत्थान, सीमावासीयांचा न्यायलढा, शिक्षणातील मराठी माध्यमाची मजबुती, ग्रामीण भागातील विकास या सर्व मुद्यांवर ‘दैनिक तरुण भारत’ प्रमाणेच त्यांचीही भूमिका ठाम, स्पष्ट आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी पत्रकारीतेला एक सामाजिक चळवळ, एक विचारप्रवाह आणि मराठी अस्मितेचे प्रतीक बनवले. आपल्या 50 वर्षांच्या पत्रकारितेमध्ये डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सीमा वादात मराठी माणसाचा आवाज, त्याच्या अस्मितेच्या रक्षणाचा प्रयत्न केला. डॉ. प्रतापसिंह जाधवांचा 80वा वाढदिवस हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नव्हे, तो मराठी पत्रकारितेचा, मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा उत्सव आहे. त्यांच्या या वाटचालीला मनापासून शुभेच्छा!








