दिग्गेवाडी येथील कुटुंबीयांचे केले सांत्वन
बेळगाव : व्हसा दिग्गेवाडी, ता. रायबाग येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी गुरुवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी भेट दिली. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. बसवराज भीमाप्पा सगरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. बसवराजची पत्नी शोभा व दोन मुलांची भेट घेऊन पालकमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबीयांना त्वरित पाच लाख रुपये भरपाई वितरित करण्याची सूचना सतीश जारकीहोळी यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना केली. बसवराजने वेगवेगळ्या बँकातून काढलेल्या कर्जाविषयीही पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. कोणतीही समस्या असली तरी धाडसाने सामोरे गेले पाहिजे. नहून तुमच्यावर विसंबून असलेले कुटुंबीय अनाथ होतात. त्यांना अर्ध्यावरच सोडून देणे योग्य ठरणार नाही, असे सांगत धाडसाने समस्यांना सामोरे जात जीवन जगण्याचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, रायबागचे तहसीलदार सुरेश मुंजे, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, शिवू पाटील, महावीर मोहिते आदी उपस्थित होते.









