तसेच महामार्गावर अपघातात मयत ऋतुजा पांढरे कुटुंबियांचे सांत्वन; पीडित कुटुंबीयांना तात्काळ मदत करण्याचे आश्वासन
उचगाव / वार्ताहर
पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीला जुनोनी गावाजवळ झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. दुर्घटनेत बळी गेलेल्या अनमोल माणसांची उणीव कुटुंबीयांना कायमस्वरूपी राहते. ती दुसरे कोणी भरून काढू शकत नाही. पण पीडित कुटुंबीयांना तात्काळ मदत देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
वळीवडे ता. करवीर येथे गुरुवारी सायंकाळी अपघातग्रस्त पोवार कुटुंबीयांची भेट घेऊन केसरकर यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, तहसीलदार शितल मुळे (भांबरे) उपस्थित होते.
दरम्यान, बारा दिवसापूर्वी उचगाव महामार्गावर वळीवडेच गावचे लोकनियुक्त सरपंच अनिल पंढरे यांच्या पुतणी ऋतुजा पंढरे या युवतीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी पालकमंत्र्यांनी भेट दिली. आणि महामार्गावरील अपघात नियंत्रणासाठी काय उपाययोजना करता येतील ते पहावे, तसेच दिंडीतील पीडित कुटुंबीयांना मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली आर्थिक मदत ताबडतोब पिडितांना मिळावी अशा सूचना संबंधित प्रशासन यंत्रणेला दिल्या. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, जि. प. सदस्य महेश चौगुले , गांधीनगरचे सपोनि सत्यराज घुले, ग्रामविकास अधिकारी बी. डी. पाटील, तलाठी प्रवीण शेजवळ, संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी ग्रा.प. सदस्य, व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.