सांगली :
गेल्या काही दिवसापासून सांगली महापालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांच्यातून सातत्याने रोष व्यक्त करण्यात येत होता. त्यातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याकडे कानाडोळा केला होता. यावरून त्यांच्यावर टिकेचा भडिमारही करण्यात आला होता. त्यामुळे अखेर सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे महापालिकेचा आढावा घेणार आहेत. यामध्ये वाढीव घरपट्टी, टक्केवारी आणि महापालिकेच्या कारबाराबाबत सत्ताधारी आमदारच नाराज आहेत, त्यावरूनही मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
सांगली महापालिकेने घरपट्टी वाढीच्या नोटीसा नागरिकांना पाठविल्या आहेत. यामध्ये अनेक चुका आहेत. तसेच ही घरपट्टी कोणत्या मुद्यावरून वाढवण्यात आली, याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी मोठ्याप्रमाणात यावर हरकती घेतल्या आहेत. या हरकतीवर आता सुनावणी सुरू आहे. त्यामुळे ही वाढीव घरपट्टी थांबवावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. यावरून सत्ताधारी आमदार सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांनीही महापालिकेच्या प्रशासनाला या वाढीव घरपट्टीला थांबवा असे आदेश दिले होते. पण या आदेशाला महापालिकेच्या प्रशासनाने जुमानले नाही. त्यामुळे हे दोन्ही सत्ताधारी आमदार महापालिकेच्या कारभाराबाबत नाराज असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे त्याचा रागही आता या आढावा बैठकीत निघणार आहे.
दरम्यान महापालिकेच्या टक्केवारीचा विषय तर सध्या मोठ्या प्रमाणात गाजत चालला आहे. या टक्केवारीची माहिती लेखी तक्रार करून ठेकेदारांनीच आयुक्तांच्या कानावर घातली आहे. त्यामुळे जी चर्चा यापुर्वी कधीच उघड उघड झाली नाही, ती आता ऑन रेकॉर्ड आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या टक्केवारीची सुरस कथा ऐकण्यास येत आहेत. यावर आता पालकमंत्री कोणती भूमिका घेतात तेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिका क्षेत्रात जे चांगले रस्ते होते त्याच रस्त्यावर पुन्हा एकदा डांबरीकरण करण्यात येत आहे. याचा जाबही नागरिकांनी तसेच माजी पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला विचारणा केली होती. पण यावर या ठेकेदारांने अरेरावीची भाषा वापरली होती. त्यामुळे एका ठेकेदाराच्या पुत्राला माजी उपमहापौरांनी थेट चौकात सर्व नागरिकांच्यासमोर कानाखाली वाजविली होती. यातून हे टेंडर मॅनेजचा प्रकार होता असे समोर आले आहे. त्यामुळे यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी आहेत. तसेच शेरीनाल्याचा प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे यावरही चर्चा होणार आहे. सांगलीकरांना शुध्द पाणी कधी मिळणार असा सवाल आता नागरिक करत आहेत. या सर्व प्रश्नावर आता पालकमंत्री कोणता आढावा घेणार हे सोमवारीच समजेल. तसेच या बैठकीत झाडाझडती होणार की फक्त शासकीय बैठक होणार हे सोमवारीच समजणार आहे.








