सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून घेण्यात आलेल्या मॅनहोलची सफाई करणाऱ्या पहिल्या रोबोटचे हस्तांतर महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. हा रोबोट संपूर्ण सेन्सरवर ऑपरेट करता येतो. त्यामुळे ड्रेनेज चेंबरमध्ये गाळ काढण्यासाठी आता कामगारांना उतरावे लागणार नाही.
महापालिका क्षेत्रात 7 हजार हुन अधिक भुयारी चेंबर आहेत. या चेंबरमधील गाळ काढण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये उतरून गाळ काढावा लागत होता. यामुळे दुर्घटना घडून कामगारांना इजा होण्याचे प्रकार घडत होते. यामुळे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका क्षेत्रातील भुयारी चेंबर स्वच्छतेची स्वच्छता अत्याधुनिक रोबोटद्वारे करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या होत्या. यानुसार पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी नियोजन समितीकडून 3 नोव्हेंबर 2022 रोबोट खरेदीसाठी 39 लक्ष 52 हजाराचा निधी मंजूर करत या निधीतून जेन रोबोटिक आणि सांगली पार्टनर व्हाइस फिंच रोबोटिक कंपनीकडून हा रोबोट खरेदी करण्यात आला आहे. या रोबोटकडून आता सांगली मिरजेतील खोलवर असणाऱ्या ड्रेनेज मधील गाळ काढला जाणार आहे. यामुळे कर्मचारी खाली उतरून केली जाणारी स्वच्छता आणि यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळता येणार आहेत. आज कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते या मेन हॉल स्वच्छ करणाऱ्या रोबोटचे लोकार्पण करण्यात आले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही या रोबोटची पाहणी करीत कौतुक केले. यावेळी महापलिका आयुक्त सुनील पवार, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, उपआयुक्त स्मृती पाटील, माजी महापौर आणि स्थानिक नगरसेविका संगीता खोत, नगरसेवक पांडुरंग कोरे, नगरसेवक आनंदा देवमाणे, गणेश माळी, मोहन व्हनखंडे, बाबासाहेब आळतेकर, गजानन कल्लोळी, महापालिकेचे शहर अभियंता आप्पा अलकुडे, जलानिस्सरण अभियंता तेजस शहा, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, जेन रोबोटिकसचे जनरल मॅनेजर श्रीपाद सुभेदार, सांगली पार्टनर व्हाइस फिंच रोबोटिक कंपनीच्या मेघनाताई कोरे, रुथा हेरवाडकर यांच्यासह कंपनीचे अधिकारी, टेक्निकल टीम उपस्थित होते.








