मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी रामलल्लाच्या मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी झालेल्या प्रभू श्रीरामांच्या महाआरतीवेळी त्यांनी उपस्थिती लावली.
आपल्या आयोध्या दौऱ्यावर बोलताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, “शिवसैनिकांच्या उपस्थितीने आज अयोध्या नगरी भगवामय झाल्याचे पाहून आनंद वाटला. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात येत असलेले पाहून अत्यंत समाधान वाटले. प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाने जनसेवेसाठी ऊर्जा मिळाली आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यासमयी अयोध्या नगरीत सुरू असलेल्या ऐतिहासिक राम मंदिराच्या निर्माण कार्याची पाहणी केली. यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मंत्री, आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









