कोल्हापूर / संतोष पाटील :
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिह्याच्या राजकारणात पालकमंत्री या नात्याने अॅक्टीव्ह व्हावे, खंडपीठ, रस्ते, कचरा नदी प्रदूषण, शक्तिपीठ आदी सर्वच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, बायपास नको, थेट शस्त्रक्रियाच करुन ठोस तोडगा काढावा, असे सुचक आवाहन मंत्री प्रकाश आबिटकर यांचे गुरूबंधू माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी सोमवारी एका अनौपचारिक कार्यक्रमात केले. आबिटकर यांना रिचार्ज करुन पॉलिटिकली अॅक्टिव्ह व्हावेत, यामागे जिह्याच्या राजकारणातील भविष्याच्या नांदीसह कागलच्या गटातटाच्या राजकारणाचीही किनार आहे.
आबिटकर यांना कॅबिनेट मंत्रिपदासह कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळावे, यामागे प्रा. संजय मंडलिक यांनी एका अदृश्य शक्तीप्रमाणे काम केले. आबिटकर यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शब्द टाकून तो खरा करण्यामागे प्रा. संजय मंडलिक यांच्यासमवेत घडलेल्या राजकारणाचीही किनार होती. लोकसभा निवडणुकीतील कागलकर नेत्यांची भूमिका आणि कोल्हापूर शहरातील काही नेत्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे प्रा. मंडलिक यांच्या रडारवर जिह्यातील महायुतीमधीलच काही नेते आहेत.
आबिटकर हे आपणाला राज्यमंत्रिपद मिळेल, अशी आशा धरुन होते. कॅबिनेट तेही सार्वजानिक आरोग्य खाते मिळाल्याने प्रकाश आबिटकर यांना शिवसेना बंडखोरीवेळी शिंदे गटात जाण्याचा निर्णय सार्थकी झाल्याचा आनंद झाला. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह नव्हता.
आबिटकर यांना कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्रिपद मिळण्यात ते स्वत:ही तितकेच लायक आणि सक्षम आहेत, स्मितभाषी आणि मनमिळावू स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कार्यपद्धती, तिसऱ्यांदा मिळवलेला विधानसभा निवडणुकीतील विजय ही कारणेही तितकीच कारणीभूत होती. हे खरे असले तरी पालकमंत्रिपद म्हणजे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी आणि जिल्हा प्रशासनावर पकड राहणार असल्याने आबिटकर यांनाच पालकमंत्री करावे, असा आग्रह माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा होता.
या पार्श्वभूमीवर प्रकाश आबिटकर यांनी पालकमंत्री म्हणून जिह्यातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवावे, त्याचे राजकीय श्रेय घेण्यासह या कामात पुढाकार घ्यावा, अशी सुप्त इच्छा प्रा. संजय मंडलिक यांनी बोलून दाखवली. राजारामपुरीतील डॉ. सचिन पाटील यांच्या सचिन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विविध वैद्यकीय शाखांच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोरच प्रा. मंडलिक यांनी आपली इच्छा बोलून चर्चेला वाट मोकळी करुन दिली.
खंडपीठ आंदोलनासाठी तोडगा काढण्यात पुढाकार घ्यावा, शक्तिपीठावरुन जो वाद सुरू आहे, त्याबाबत ठोस भूमिका घ्यावी, शहर, जिह्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी भरघोस निधीची तरतूद करुन काम पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करावा, असे प्रा. संजय मंडलिक यांनी सांगितले. माजी खासदार मंडलिक यांच्या सल्ल्यामागे आबिटकर यांना पॉलिटिकली रिचार्ज करण्याचा हेतू होता. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ इच्छूक होते. कोल्हापूरकरांच्या मनातील ‘मीच पालकमंत्री’ असे बोलून त्यांनी ही खदखदही व्यक्त केली होती.
दुसऱ्या बाजूला शिंदे गटाच्या मंत्रिपदाच्या शर्यतीत आमदार राजेश क्षीरसागर आघाडीवर होते. आबिटकर मंत्री होताच राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत अडीच वर्षानंतर आपण मंत्री असू, असे भाकीत केले होते. लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची रणनिती आणि पडलेले मताधिक्य याचे गणित प्रा. संजय मंडलिक यांच्या आबिटकर यांच्या सल्ल्यामागे असावे. प्रकाश आबिटकर जितका कामाचा धडाका लावतील तितके त्यांनाच त्याचे श्रेय मिळणार आहे, आपसूकच पालकमंत्री या नात्याने जिह्याचा नेता म्हणून आबिटकरांच्या गळ्यात माळ पडेल, अशी रणनिती प्रा. संजय मंडलिक यांच्या या रिजार्ज करण्यामागे असल्याचीच चर्चा आहे.
- आता कार्यतत्परता दाखवावी लागेल
मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेण्यास कालही वाव नव्हता आणि उद्याही संधी मिळणार नाही. येणाऱ्या प्रत्येकासोबत ते जिव्हाळ्याने बोलतात, त्यांची कामे व्हावीत यासाठी तळमळ दाखवतात. मात्र आता खंडपीठ कधी होणार? रखडलेल्या कासवछाप योजनांना गती कधी येणार? पंचगंगा राहिली मैलीच आहे, रस्ते गेले खड्ड्यात, कचरा शहरवासियांच्या उरावर आहे. अंबाबाई आराखडा कागदावरुन प्रत्यक्षात कधी? कोल्हापूरची कनेक्टिव्हीटी कधी वाढणार, उद्योग, व्यापारासाठी कोल्हापूर पूरक बनवणे, महापुराच्या समस्येतून कायमचा तोडगा आदी अनेक समस्या आहेत. या सर्वच मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोडवाव्यात, अशी अपेक्षा करणेही गैरवाजवी ठरेल. तरीही त्यांना आरोग्य विभागासह जिह्यात ठोस काम करुन कार्यतत्परता दाखवावी लागणार असल्याचे संकेत प्रा. संजय मंडलिक यांनी आपल्या वक्तव्यातून दिले.








