पर्यटनमंत्री असल्याची टीका : आठ महिन्यात एकदाही भेटण्यासाठी वेळ दिली नसल्याची तक्रार : विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीवरून वाद उफळला
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिक्षण मंत्री असलेल्या आणि कोल्हापूरचे पालकमंत्री असणाऱ्या दीपक केसरकर यांच्या विरोधात शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून विविध प्रश्न, समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही पालकमंत्र्यांनी बघुया, पाहुया, पुढच्या वेळी भेटुया अशी आश्वासने देत एकदाही वेळ दिली नाही, चर्चा केली, अशा शब्दात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केसरकर यांच्याविषयी रोष, राग व्यक्त केला आहे. राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर असताना भाजपकडून देण्यात आलेली विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीच्या अर्जावर पालकमंत्र्यांची सही झाली नसल्याने ते अर्ज प्रलंबित आहेत. त्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करताना प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर कांबळे यांनाही जाब विचारला.
प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी विशेष कार्यकारी अधिकारी पदांच्या प्रलंबित असलेल्या नियुक्यांबाबत विषयात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांची भेट घेतली. यावेळी नियुक्ती प्रक्रियेतील प्रशासनाच्या वेळकाढूपणाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्यात भाजपा-शिवसेना (शिंदे) सरकार सत्तेत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारीपद बहाल करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या वतीने केला जातो. परंतु जिह्याच्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याविषयात लक्ष न दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेले अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभाग अजूनही 2015 च्या जीआरनुसार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचे काम करत असल्याचे शिष्टमंडळाला दिसून आल्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने थेट या कार्यालयासाठी अद्यावत मे 2023 चा सुधारित जीआरची प्रिंट काढून निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांना दाखविण्यात आली. सुधारित जीआर नुसार नव्याने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचा अधिकार पालकमंत्री व स्थानिक प्रशानाला आहे. त्यामुळे नियुक्त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, अशी जोरदार मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. त्यावर निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांनी पालकमंत्र्यांचे पत्र मिळताच नियुक्त्या तत्काळ करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनाव्दारे भाजपचा पालकमंत्र्यांवर हल्लाबोल
दरम्यान, या संदर्भात भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव यांनी एका निवेदनाव्दारे पालकमंत्री केसरकर यांच्याबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये रोष असल्याचे सांगितले. महेश जाधव यांनी सांगितले की, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. भाजप सत्तेत असताना युतीतील पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे असणारे पालकमंत्री दीपक केसरकर हे भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दुर्लक्ष करत आहेत. गेली आठ महिने आम्ही भाजपचे पदाधिकारी त्यांच्याकडे समस्या, प्रश्न यावर चर्चा करण्यसाठी भेट मागत आहोत, वेळ मागत आहोत, पण पालकमंत्री केसरकर दरवेळी वेळ मागूनही वेळ देत नाहीत. बघुया, पुढच्यावेळी भेटुया, अशी उत्तरे देत भेट टाळत आहेत. त्यांच्या टाळाटाळीच्या प्रकारामुळे पदाधिकाऱ्यांना राग आहेत. विशेष कार्यकारी अधिकारीपदाचे भाजपच्या कार्यकर्त्यांचे अर्जही अजून प्रलंबित आहेत. पालकमंत्र्यांची सही नसल्याने जिल्हा प्रशासन नियुक्या करत नाही. आमचे सरकार असूनही पालकमंत्री भाजप पदाधिकाऱ्यांसाठी निष्क्रियता दाखवत आहे. पालकमंत्री असूनही ते पर्यटन मंत्र्यासारखे वागत आहेत. त्यांची भेट घेऊन विशेष कार्यकारी अधिकारीपदांच्या नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी करणार असल्याचेही महेश जाधव यांनी सांगितले.









