प्रतिनिधी,कोल्हापूर
आगामी विधानसभा निवडणुक कोणाच्या नेतृत्त्वाखाली लढवणार याबाबत अनेक अफवा पसरत आहेत. परंतु यामध्ये कोणतेही तथ्य नाही. 2024 ची विधानसभा निवडणुक हि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच महायुती सरकारने गेल्या वर्षभरात सर्वसामान्य जनतेचे हित कल्याण डोळ्यासमोर ठेवून घेतेलेले निर्णय, राबाविलेल्या योजना घराघरात पोहचवा असे आवाहनही पालकमंत्री केसरकर यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी शिवाजी पेठेतील पेटाळा मैदान येथे शिवसेनेचा मेळावा झाला. याप्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर आदी प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा लाभला आहे. शिवशाहूंचे वैभव असलेली ही नगरी तेजोमय करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. जिल्ह्यातील गडकिल्ले संवर्धनासाठीची प्रक्रीया सुरु आहे. शिवाजी पुल, पंचगंगा नदी घाट सुशोभिकरण, विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणामुळे येथील काही रस्ते बंद झाले आहेत, त्या रस्तांसाठी 30 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देण्याची विनंती पालकमंत्री केसरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठबळ दिले. कोल्हापुरच्या विकासासाठी भरभरुन निधी दिला. कोल्हापूरवर ओढावलेल्या महापूराच्या संकटातही मुख्यमंत्री शिंदे यांनी 250 ट्रक भरुन कोल्हापूर वासियांना मदत पाठवली. त्यामुळे कोल्हापुर वासियांना आपलस वाटणार हे नेतृत्व आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोल्हापूरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठबळ देतील असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
मेळाव्याला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रविंद्र माने, राजेखान जमादार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राहूल चव्हाण, बाजार समितीचे संचालक नंदकुमार वळंजू, महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव, युवासेना जिल्हाध्यक्ष प्रसाद चव्हाण, रणजीत जाधव, किशोर घाटगे, महेंद्र घाटगे, प्रा. शिवाजी पाटील, मंगल साळोखे, पुजा भोर, पवित्रा रांगणेकर आदींसह अन्य पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
क्षीरसागर यांना राज्यपाल नियुक्त आमदार करा
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या 12 आमदारांमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा समावेश करावा, अशी मागणी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
तर दहा आमदार केले असते
2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरने शिवसेनेला सहा आमदार दिले. यावेळी कोल्हापूरला मंत्रीपद देणे आवश्यक होते, पण ते देण्यात आले नाही. यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे नुकसान झाले. त्यावेळी शिवसेनेला जिल्ह्यात मंत्रीपद मिळाले असते तर दहा आमदार शिवसेनेचे निवडून आणले असते असे क्षीरसागर यांनी सांगितले.
गद्दारांना राज्यसभेची उमेदवारी
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुक झाली. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आघाडीच्या उमेदवाराचा प्रामाणिक प्रचार केला. पण याची दखल घेतली गेली नाही उलट ज्यांनी कधीही शिवसेनेला मतदान केले नाही. प्रत्येक निवडणुकीत गद्दारी केली, त्यांना राज्यसभेची उमेदवारी बक्षीस देण्यात आली. पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्माचे फळ दिले. बहुमत असूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, अशी टिका क्षीरसागर यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव न घेता केली.
खासदार मंडलिक यांचा सत्कार
लोकसभेत जास्त प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांमध्ये खासदार प्रा. संजय मंडलिक हे देशातील खासदारांमध्ये पाच नंबरचे खासदार राहिले आहेत. या कामागिरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी खासदार मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यातही पत्रांवर स्वाक्षऱ्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेळाव्याला उपस्थित असताना अन्य नेते भाषण करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीतंर्गत आलेल्या पत्रांवर स्वाक्षऱ्या करण्यात व्यस्त होते. त्यांच्या या कार्यपद्धतीची मेळाव्यात चर्चा सुरु होती.
विविध संघटनांकडून सत्कार
मेळाव्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांसह समस्त हिंदूत्ववादी संघटना, क्रिडाई, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, गुरव समाज यासह अन्य विविध संघटनांकडुन सत्कार करण्यात आला.








