राज्यातील राजकारण बेभरवशी बनलेले असताना सहकारी पक्षांना ‘उद्याची हमी’ देण्याचा प्रयत्न सर्व प्रमुख पक्ष करत आहेत. निकालानंतर यातील काहींच्या भूमिका बदलण्याची शक्यता असताना त्यांचे दावे मात्र आश्चर्यकारक वाटू लागले आहेत. तर ठाकरे सेनेचा आत्मविश्वास वाढला आहे.
राज्याच्या राजकारणात उद्या काय होईल याची खात्री राहिलेली नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही अलीकडेच असे मत व्यक्त केले होते. त्याआधी त्यांनी अदानी विरोधातील आपल्या मित्र पक्षांना धक्का दिला होता. उद्धव ठाकरे यांनी आघाडीतील घटक पक्षांना विश्वासात न घेता राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेस पाठोपाठ ठाकरे सेनाही चक्रावली होती. आधीच अजितदादा अचानक नॉटरीचेबल का झाले? याची खूप चर्चा झालेली. त्यांनी पित्ताचे कारण सांगितले. तरीही सर्व गोंधळात आहेत. त्यांचे लक्ष नागपुरात होणाऱ्या वज्रमूठ सभेत अजित पवार काय बोलणार याकडे आहे. पण, शरद पवार बोलले आणि गतीने चक्रे फिरली. ठाकरे आणि राऊत सिल्वर ओकवर गेले.

भल्या सकाळी अजितदादांचा फडणवीसांसोबत शपथविधी झाला होता तेंव्हा पवार, ठाकरे, राऊत आणि सुळे जसे एकत्र दिसले होते अगदी तसाच फोटो पुन्हा लोकांना पाहायला मिळाला. फक्त ठिकाण चव्हाण सेंटर सोडून सिल्वर ओक होते! सोबत ‘उद्या काहीही होऊ शकते’ ही पवारांची ट्यून! त्यामुळे नेमके चालले काय आहे? असा संभ्रम महाराष्ट्राच्या मनात निर्माण झाला.
हे सगळे घडत असतानाच पवार दिल्लीत पोहोचले आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी त्यांची आणि राहुल गांधी यांची भेट झाली. खर्गे यांनी एक हाताने पवार तर दुसऱ्या हाताने राहूल गांधी यांना घट्ट पकडले आहे, शेजारी के. सी. वेणूगोपाल हात हातात बांधून उभे आहेत आणि मागे एक मुक्त संचार करणाऱ्या पाखराचे छायाचित्र आहे… असे रंजक दृश्यही जनतेने पाहिले. आदल्या दिवशी संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांच्याशी काँग्रेसची झालेली चर्चा आणि दुसऱ्या दिवशी पवार भेटून गेल्यानंतर शुक्रवारी काँग्रेस काय जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांना आश्चर्यचकित करणारी माहिती दिली, ती इतिहासात प्रथमच गांधी घराण्याचे सदस्य राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत! काहींनी हा पवारांचाच सल्ला म्हटले तर काहींनी भविष्यात भाजपसोबत राष्ट्रवादी जाण्याची शक्यता असल्याने गांधी यांनी महाराष्ट्रात एक साथीदार असावा याची तजवीज केली असा अर्थ लावला. ठाकरे यांच्याकडे नव्याने झुकलेला मुस्लिम आणि दलित वर्ग, सॉफ्ट हिंदुत्ववादी यांच्याशी जोडून घेणे, सावरकरांबाबतचा गैरसमज दूर करणे मित्र पक्षांना मान देतो हे देशभर दाखवून देणे आणि अडचणीतील मित्राबरोबर राहतो हा संदेश राहूल यांना द्यायचा आहे. पण अशावेळी आठवली ती राष्ट्रवादीवर अविश्वास दर्शवणाऱ्या प्रकाश आंबेडकर, शिवाय काही भाजप समर्थकांची राष्ट्रवादीबाबतची वक्तव्ये! यापूर्वीही ती आली असून खुद्द शरद पवार यांनी ती फेटाळून लावतानाच पक्षाच्या राजकारणाला भाजपविरोधी गती दिलेली आहे. मात्र तरीही राष्ट्रवादीला वारंवार खुलासा करावा लागतो. त्याचे कारण दादांच्या बंडात आहे. जरंडेश्वर कारखाना प्रकरणी अजितदादा यांचे नाव आरोपपत्रातून वगळल्याने हा संभ्रम अधिक वाढला. घाईघाईने दादांना खुलासाही केला. विधिमंडळात भाजप विरोधात टोकाची भूमिका घेऊन सुद्धा त्यांनी फडणवीसांच्या सोयीचा एक प्रश्न विचारल्याने त्यांच्या बाबतीत संभ्रम कायम राहिलाय. ‘त्या’ भन्नाट संभ्रमाचा हा दुसरा अंक म्हणावा इतके त्यात साम्य आहे!
शिंदेच नेते, त्यांच्याच नेतृत्वाखाली!
सर्वोच्च न्यायालयातील निकाल शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या विरोधात जाईल अशी अटकळ व्यक्त केली जात आहे. न्यायालयाचा निकाल असाच लागेल असे ठामपणे सांगता येत नसतानाही हे सुरू आहे. त्यात आदित्य ठाकरेंनी जोशात केलेले वक्तव्य, एकनाथ शिंदे बंडापूर्वी मातोश्रीवर रडल्याचा दावा आणि राष्ट्रवादीचा एक गट फुटण्याची चर्चेमुळे निर्माण झालेल्या गोंधळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
पुढची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप लढेल अशी भूमिका जाहीर करावी लागली. आधीच शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अनेकांना मनावर दगड ठेवावे लागले आहेत. त्यात फडणवीसांचे वाक्य मनावर ओझे वाढवणारेच! पण हा खुलासा त्यांना का करावा लागला? भाजप आणि शिंदे सेनेचे राजकारण सुद्धा असेच अविश्वासावर पोसलेले आहे का?
मुंडे पॉवरची चर्चा आणि बावनकुळे
महाराष्ट्र भाजपला ज्यांनी भक्कम केले त्या गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी पाथर्डीला भगवानगड पायथ्याशी नारायणशास्त्राr यांच्या मध्यस्थीने एकत्र येऊन मुंडे पॉवरचे दर्शन घडवण्याचे सुतोवाच केले. पाथर्डीत ढाकणेंना शांत केले तर पंकजा तिथून लढण्यास तयार आहेत. म्हणजे परळीतून धनंजय यांचा रस्ता मोकळा होतो. किंवा दोघांपैकी एक लोकसभेला उभे राहू शकतात. पण ते राष्ट्रवादीत एकत्र येणार की भाजपमध्ये? हे सर्वोच्च न्यायालयातील निकालावरूनच कळेल. तोपर्यंत त्यांच्यावर कारवाया सुरूच राहतील.
या दोन्ही भावंडांमध्ये एकोपा वाढीस लागावा अशीच आपली भावना असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले असले तरी तो त्यांच्या पक्षात किती जणांना रुचेल? मुंडे पॉवर म्हटले गेलेले अनेक घटक भाजपपासून दूर गेलेत. राहिलेल्यांना भाजपमध्ये जावे लागले. सावध जानकर शेट्टींसारखे काही सटकले. कर्नाटक विधानसभेत भाजपने ऐनवेळी अनेकांना डच्चू देऊन नवख्यांना साथ दिल्यानेसुद्धा महाराष्ट्रातही अनेक जण सावध झाले आहेत. अशा सर्वांना हमी हवी आहे आणि ती दिली तरी विश्वास बसेलच असे वातावरण राहिलेले नाही!
शिवराज काटकर








