खानापुरात दोन तास रास्तारोको आंदोलन; अधिकारी धारेवर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला प्रतिसाद
प्रतिनिधी/खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल सोमवारी रुमेवाडी क्रॉस येथे सकाळी 11 वाजता रास्तारोको करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. दोन तास रास्तारोको केल्यानंतर खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन व पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे तसेच रास्ता प्राधिकरणाचे पाटील यांनी चर्चा करून पुढील पाच दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे समिती कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.
जांबोटी क्रॉस ते गोवा क्रॉस हा संपूर्ण रस्ता नादुरुस्त झाला असून रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. रस्ता की खड्डा, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. आठवडय़ातून तीन-चार अपघात होत आहेत. तसेच या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण व त्रासदायक बनले आहे. या भागात दि. 7 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने दि. 18 जुलैपर्यंत रस्ता दुरुस्त करून वाहतुकीस योग्य करावा, अन्यथा रास्तारोको करू, असे लेखी निवेदन तहसीलदार प्रवीण जैन यांना दिले होते. या निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याने सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने रुमेवाडी क्रॉस येथे रास्तारोको करण्यात आला.
वाहनांच्या रांगाच रांगा
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दोन तास रास्तारोको झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पोलीस व तहसीलदार प्रवीण जैन हे आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत होते. मात्र जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समिती कार्यकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
तहसीलदार प्रवीण जैन हे रस्ता प्राधिकरणाच्या अधिकाऱयांशी वारंवार संपर्क साधून याबाबत तोडगा काढण्यासाठी चर्चा करत होते. मात्र प्राधिकरणाचे अधिकारी चर्चा करण्यास शेवटपर्यंत उपस्थित राहू शकले नाहीत.
त्यामुळे प्रवीण जैन यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना शुक्रवारपर्यंत रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत.
अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
प्रवीण जैन व निरीक्षक सुरेश शिंगे यांनी म. ए. समितीच्या आंदोलकांशी चर्चा केली. पुढील पाच दिवसांत कोणत्याही परिस्थितीत रस्ता दुरुस्त केला जाईल, याची जबाबदारी मी तहसीलदार या नात्याने घेत आहे. तरी आपण आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन केले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील यांनी चर्चेला प्रतिसाद देत पुढील पाच दिवसांत रस्ता दुरुस्त झाला पाहिजे, हीच आमची भूमिका राहील. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
या रास्तारोको आंदोलनात विलास बेळगावकर, मुरलीधर पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, प्रकाश चव्हाण, बाळाराम शेलार, आबासाहेब दळवी, महेश प्रभू,. विठ्ठल गुरव, रमेश धबाले, शिवाजी पाटील, जयसिंग पाटील, अनंत पाटील, अजित पाटील, नारायण कापोलकर, शामराव पाटील, मऱयाप्पा पाटील, विशाल पाटील, सदानंद पाटील, शंकर पाटील, रमेश देसाई, ब्रम्हानंद पाटील, पुंडलिक पाटील, डी. बी. भोसले, गणपत गावडे, अनंत पाटील, दीपक देसाई, प्रवीण पाटील, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार, प्रदीप पाटील यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दिगंबर पाटील यांनी यावेळी म्हणाले, गेली तीन वर्षे लोंढा रस्ता बंद पडला आहे. तसेच जांबोटी क्रॉस ते गोवा क्रॉस हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून याकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. तसेच तालुक्याच्या आमदार रस्त्याबाबत हतबल असल्याचे जाहीर करतात, ही खेदाची बाब आहे. तसेच तालुक्यातील सर्व संपर्क रस्ते हे अवघ्या एका वर्षात उद्ध्वस्त झाले आहेत. याबाबतही आमदार मौन का बाळगत आहेत, असाही सवाल दिगंबर पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी यांसह अनेकांनी प्रशासनाच्या तसेच आमदारांच्या निषेधार्थ प्रतिक्रिया दिल्या.
आमदार अंजली निंबाळकर यांनी मी काय करू,. असे हतबलतेचे फलक लावले होते. यावर मी काय करू, राजीनामा द्या घरी बसा, अशा घोषणा देण्यात येत होत्या. तालुक्यातील संपर्क रस्तेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. एका वर्षातच रस्ते नादुरुस्त तसेच खड्डे पडल्याने कंत्राटदार व लोकप्रतिनिधी यांच्यात साठेलोटे असल्याच्या घोषणाही देण्यात येत होत्या.
खड्डे पडलेल्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. शंभर झाडे लावण्यात आली होती. पाऊस असतानादेखील आंदोलक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. काही आंदोलकांनी चिखलातच बसून शासनाचा निषेध केला.