पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे मत : गृहज्योती योजनेचा शुभारंभ
प्रतिनिधी/ बेळगाव
गृहज्योती योजनेचा बेळगाव जिल्ह्यातील 8 लाख 25 हजार 700 ग्राहकांना लाभ होणार आहे. राज्य सरकारकडून प्रतिवर्षी 516 कोटी रुपये गृहज्योतीसाठी बेळगाव जिल्ह्याला दिले जाणार आहेत. वीजबिल माफ होणार असल्याने कुटुंबांवरील बोजा काहीसा कमी होईल. राज्य सरकारकडून पुरविल्या जाणाऱ्या गॅरंटी योजनांमुळे राज्यातील नागरिक आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री व राज्याचे बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
गृहज्योती योजनेचा शुभारंभ शनिवारी जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते कुमार गंधर्व कलामंदिर येथे करण्यात आला. सरकारने वचन दिलेल्या प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत मोफत वीज या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात प्रत्येक मतदारसंघातील चार सदस्यांना शून्य रुपयाचे वीजबिल प्रातिनिधिक स्वरुपात देण्यात आले.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, काँग्रेसने दिलेली आश्वासने सत्तेत येताच पूर्ण करण्यास सुरुवात केली. शक्ती योजनेमुळे सर्वसामान्य महिलांनाही मोफत प्रवास करता येत आहे. गृहज्योतीमुळे मोफत वीज वापरता येईल. याचबरोबर गृहलक्ष्मी योजनेमुळे प्रत्येक महिला आत्मनिर्भर होणार आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत गॅरंटी स्कीम अंमलात आणल्याबद्दल आभार मानले. काँग्रेसने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण केली. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेल्याचे त्यांनी सांगितले. गॅरंटी योजनांसाठीचा पैसा कोठून उभारणार, यावर विरोधक टीका करत होते. परंतु, राज्य सरकार अर्थतज्ञांची मदत घेऊन सक्षम सरकार चालविल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी हेस्कॉमचे बेळगाव विभागीय मुख्य अभियंते व्ही. प्रकाश यांनी प्रास्ताविक करत जिल्ह्यातील लाभार्थी व यासाठी येणारा खर्च याविषयीची माहिती दिली. यावेळी सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, हुक्केरी हेस्कॉमचे संचालक पृथ्वी कत्ती, जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील, जि. पं. सीईओ हर्षल भोयर, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, हेस्कॉमचे हुबळी येथील व्यवस्थापक सिद्धू हल्लोळी, के. एल. श्रीनिवास, बेळगाव विभागीय अधिकारी प्रवीणकुमार चिकाडे, बेळगाव मनपा नगरसेवकांसह हेस्कॉमचे अधिकारी उपस्थित होते.
आसन व्यवस्थेवरून नाराजी
हेस्कॉमकडून कुमार गंधर्व कलामंदिर येथे गृहज्योती योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, जिल्हाभरातून लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते आल्यामुळे बैठक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. राखीव जागांवर महानगरपालिकेचे काही नगरसेवक बसले होते. काही व्यक्तींनी त्यांना तेथून हुसकावून लावले. यामुळे नाराजीचा सूर उमटत होता. याची माहिती मनपा आयुक्तांना समजताच त्यांनी सर्व नगरसेवकांना व्यासपीठावर बोलाविले. परंतु, घडलेल्या या प्रकारामुळे नगरसेवक मात्र नाराज झाले.









