1 लाख बँक खाती निष्क्रिय : योजनेत अनेक अडचणी, लाभार्थ्यांना चिंता
प्रतिनिधी/ बेळगाव
निष्क्रिय बँक खाते, बँक खात्याला आधार लिंक नाही, आणि ई-केवायसी नाही यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यातील 1 लाख 40 हजारहून अधिक अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकाधारक कुटुंबीयांना अन्नभाग्य योजनेतील रोख रकमेपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे लाभार्थी कुटुंबीयांची चिंतादेखील वाढली आहे.
सरकारने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 170 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. मात्र काही लाभार्थ्यांचे बँक खाते नाही तर काहीचे आधारकार्ड लिंक नाही. अशा लाभार्थ्यांना रोख रक्कम वितरित करताना अडचणी येणार आहेत. या बरोबर बहुतांशी लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली नाही. त्यामुळे योजनेत अडथळा येणार आहे. सरकार अन्नभाग्य योजनेंतर्गत पाच किलो तांदळाऐवजी प्रति किलो 34 रुपयांप्रमाणे प्रत्येक लाभार्थीस 170 रुपये मिळणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांने किमान तीन महिन्यांतून एकदा तरी रेशन घेणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड, कुटुंबप्रमुखाचे बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यात 11 लाख 40 हजार लाभार्थ्यांपैकी तब्बल 1 लाख 40 हजार बँक खाती निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना रोख रक्कम कशी जमा करायची? असा प्रश्नदेखील खात्याला पडत आहे. मध्यंतरी ई-केवायसीसाठी आणि रेशनकार्ड आधारकार्ड लिंक करण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती. मात्र काहांनी याकडे दुर्लक्ष करून ई-केवायसी व आधारकार्ड लिंकदेखील केले नाही.
श्रीशैल कंकणवाडी (सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते)
अंत्योदय आणि बीपीएल रेशनकार्ड कुटुंबप्रमुखाचे बँक खाते आधारकार्डशी लिंक केल्यानंतरच अन्नभाग्य योजनेचा लाभ घेता येईल. काही लाभार्थ्यांचे बँक खाते बंद आहे. त्यामुळे अडचणी येत आहेत.
आधारकार्डवर मोबाईल क्रमांक अनिवार्य
अन्नभाग्य योजना जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 11 लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. मात्र यापैकी 1 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय आहेत. खाते नसलेल्या लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडणे आवश्यक आहे. त्याबरोबर ईकेवायसी आणि बँक आधार लिंक करणेदेखील आवश्यक आहे. आधारकार्डवर मोबाईल क्रमांक असणे अनिवार्य आहे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे.









