कर्णधार सॅमसन-हेटमेयर यांची दमदार अर्धशतके, राजस्थानचा चौथा विजय
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2023 च्या टाटा आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसन आणि हेटमेयर यांच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सचा चार चेंडू बाकी ठेवून 3 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने आपला चौथा विजय नोंदवत गुणतालिकेत आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले. त्यांनी 5 सामन्यातून 8 गुण घेतले आहेत.
शुबमन गिल आणि डेव्हिड मिलर यांच्या समयोचित फलंदाजीच्या जोरावर यजमान गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले. गुजरातने 20 षटकात 7 बाद 177 धावा जमवल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 19.2 षटकात 7 बाद 179 धावा जमवत विजय नोंदवला.
गुजरातच्या 178 धावांच्या आव्हानाला तोंड देताना राजस्थान रॉयल्सची सलामीची जोडी यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर केवळ 4 धावात तंबूत परतली. हार्दिक पंड्याने जैस्वालला गिलकरवी एका धावेवर झेलबाद केले. तर मोहमद शमीने बटलरचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडवला. देवदत्त पडीक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 43 धावांची भागीदारी केली. रशीद खानने पडीक्कलला शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 25 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारासह 26 धावा जमवल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला रियान पराग 5 धावा काढून रशीद खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. संजू सॅमसनने आक्रमक फटकेबाजी करत 32 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारासह 60 धावा झोडपल्या. 15 व्या षटकात सॅमसन नूर अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 15 षटकाअखेर राजस्थानची स्थिती 5 बाद 114 अशी होती.
हेटमेयर आणि जुरेल या जोडीने आपल्या संघाला विजयाच्या समीप नेताना सहाव्या गड्यासाठी 20 चेंडूत 47 धावांची भागीदारी केली. मोहमद शमीने जुरेलला शर्माकरवी झेलबाद केले. त्याने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 18 धावा जमवल्या. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या दोन षटकामध्ये विजयासाठी 20 धावांची जरुरी होती. जुरेल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रविचंद्रन अश्विनने पहिल्याच चेंडूवर चौकार व दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. पण शमीच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अश्विन झेलबाद झाला. राजस्थानने 18.5 षटकात 7 बाद 171 धावा जमवल्या होत्या. राजस्थानला शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची जरुरी होती. कर्णधार पंड्याने हे षटक टाकण्यासाठी नूर अहमदकडे चेंडू सोपवला. हेटमेयरने पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या व पुढील चेंडूवर त्याने विजयी षटकार खेचत आपल्या संघाला चार चेंडू बाकी ठेवून थरारक विजय मिळवून दिला. हेटमेयरने 26 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 56 धावा झोडपल्या. राजस्थानच्या डावामध्ये 15 षटकार आणि 10 चौकार नोंदवले गेले. गुजरात टायटन्सतर्फे मोहमद शमीने 25 धावात 3, रशीद खानने 46 धावात 2 तर हार्दिक पंड्या आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी देत पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बोल्टने स्वत:च्याच गोलंदाजीवर साहाला 4 धावावर टिपले. गिल आणि साईसुदर्शन यांनी 27 धावांची भर घातली. पाचव्या षटकात साई सुदर्शन चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने 19 चेंडूत 2 चौकारासह 20 धावा जमवल्या. गिलला यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याची बऱ्यापैकी साथ मिळाली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 5.3 षटकात 59 धावांची भागीदारी केली. चहलने पंड्याला जैस्वालकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 19 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 28 धावा केल्या. शुबमन गिल संदीप शर्माच्या गोलंदाजीवर बटलरकडे सोपा झेल देत तंबूत परतला. त्याने 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 45 धावा झळकवल्या. गुजरातची स्थिती यावेळी 15.2 षटकात 4 बाद 121 अशी होती.
डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांनी पाचव्या गड्यासाठी 45 धावांची भागीदारी केल्याने गुजरातला 177 धावापर्यंत मजल मारता आली. झाम्पाने मनोहरला झेलबाद केले. तो 19 व्या षटकात बाद झाला. मनोहरने 13 चेंडूत 3 षटकारासह 27 धावा जमवल्या. डावातील शेवटच्या षटकात संदीप शर्माने डेव्हिड मिलरला हेटमेयरने सीमारेषेजवळ टिपले. त्याने 30 चेंडूत 2 चौकार आणि 3 चौकारासह 46 धावा जमवल्या. रशीद खान शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर धावचित झाला. त्याने 1 धाव जमवली. गुजरातच्या डावात 7 षटकार आणि 13 चौकार नोंदवले गेले. राजस्थानतर्फे संदीप शर्माने 2 तर बोल्ट, झम्पा आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 20 षटकात 7 बाद 177 (शुभमन गिल 45, साईसुदर्शन 20, हार्दिक पांड्या 28, डेव्हिड मिलर 46, अभिनव मनोहर 27, साहा 4, तेवातिया नाबाद 1, रशीद खान 1, अवांतर 5, संदीप शर्मा 2-25, बोल्ट 1-46, झम्पा 1-32, चहल 1-36).
राजस्थान रॉयल्स 19.2 षटकात 7 बाद 179 (संजू सॅमसन 60, हेटमेयर नाबाद 56, पडिकल 26, जैस्वाल 1, बटलर 0, पराग 5, जुरेल 18, रविचंद्रन अश्विन 10, बोल्ट नाबाद 0, अवांतर 3, मोहमद शमी 3-25, रशीद खान 2-46, हार्दिक पंड्या 1-24, नूर अहमद 1-29).