लखनौ सुपर जायंट्सवर 56 धावांनी मात, सामनावीर गिल-साहाची अर्धशतकांसह विक्रमी भागीदारी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात टायटन्सने आयपीएलमधील विजयी घोडदौड कायम राखत रविवारी झालेल्या साखळी सामन्यात लखनौ सुपरजायंट्सचा 56 धावांनी पराभव करून आठवा विजय नोंदवला. 51 चेंडूत नाबाद 94 धावांची खेळी करणाऱ्या शुबमन गिलला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

11 सामन्यातील गुजरातचा हा आठवा विजय असून 16 गुणांसह त्यांनी आपले अग्रस्थान आणखी भक्कम करीत प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर दणकेबाज फलंदाजी करीत त्यांनी 2 बाद 227 अशी आजवरची सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. सलामीवीर शुबमन गिल व वृद्धिमान साहा यांनी गुजराततर्फे विक्रमी 142 धावांची भागीदारी केली. त्यानंतर या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना लखनौला मेयर्स व क्विन्टॉन डी कॉक यांनी 8.2 षटकांतच 88 धावांची भागीदारी नोंदवत शानदार सुरुवात करून दिली होती. पण ही जोडी फुटल्यानंतर गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर लखनौची गाडी रूळावरून घसरली आणि त्यांना 20 षटकांत 7 बाद 171 धावांवर रोखत गुजरातने दणदणीत विजय साकार केला.

4 षटकांत 50 व त्यानंतर 10 षटकांत 102 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर अचूक मारा करीत गुजरातने लखनौच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. धावगती वाढू लागल्यानंतर लखनौच्या फलंदाजांनी कोंडी फोडण्याच्या प्रयत्नात आपले बळी गमविले. या मोसमात पहिला सामना खेळणाऱ्या डी कॉकने शानदार 70 धावांची खेळी केली. पण त्यांची मधली फळी कोसळल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. मेयर्स व डी कॉक यांनी पॉवरप्लेच्या षटकात बिनबाद 72 धावांची मजल मारली होती. रशिद खानने मिडविकेट क्षेत्रात धावत येत अप्रतिम झेल टिपत मेयर्सची खेळी संपुष्टात आणली. त्याने 32 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 48 धावा फटकावल्या. डी कॉकने आक्रमण पुढे चालूच ठेवले. पण दीपक हुडा व स्टोईनिस 11 व 4 धावा काढून बाद झाल्यानंतर डी कॉक चौथ्या गड्याच्या रूपात बाद झाला. त्याने 41 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार मारत 70 धावा तडकावल्या. नंतर आयुष बदोनी (11 चेंडूत 21) वगळता इतर फलंदाज झटपट बाद झाल्याने त्यांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. गुजरातच्या मोहित शर्माने 29 धावांत 4, नूर अहमद, रशिद खान व शमी यांनी एकेक बळी मिळविले.
गिल-साहाची गुजराततर्फे विक्रमी भागीदारी
तत्पूर्वी, गिल व साहा यांच्या शतकी भागीदारीमुळे या मोसमातील चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या गुजरातने नोंदवली. गिल-साहा यांनी 73 चेंडूत 142 धावा झोडपल्या. साहाला 81 धावांवर आवेश खानने बाद केले. त्याने 43 चेंडूत 10 चौकार, 4 षटकार मारले. कर्णधार हार्दिक पंड्याने 15 चेंडूत 25 धावा फटकावल्या. त्याचा अप्रतिम झेल त्याचाच भाऊ कृणाल पंड्याने टिपला. दोन्ही भाऊ या सामन्यात प्रतिस्पर्धी कर्णधार म्हणून आमनेसामने आले होते. मिलरने 12 चेंडूत नाबाद 21 धावा काढल्या. गिलला मात्र आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण करता आले नाही. तो 94 धावांवर नाबाद राहिला. त्याने 51 चेंडूत 2 चौकार, 7 षटकार हाणले. लखनौच्या मोहसिन खान व आवेश खान यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 20 षटकांत 2 बाद 227 : गिल 51 चेंडूत नाबाद 94, साहा 43 चेंडूत 81, हार्दिक पंड्या 15 चेंडूत 25, मिलर 12 चेंडूत नाबाद 21, अवांतर 6. गोलंदाजी : मोहसिन खान 1-42, आवेश खान 1-34.
लखनौ सुपरजायंट्स 20 षटकांत 7 बाद 171 : मेयर्स 32 चेंडूत 48, डी कॉक 41 चेंडूत 70, दीपक हुडा 11 चेंडूत 11, स्टोईनिस 4, पूरन 3, बदोनी 11 चेंडूत 21, अवांतर 8. गोलंदाजी : मोहित शर्मा 4-29, शमी 1-37, रशिद खान 1-34, नूर अहमद 1-26.









