ऑक्टोबर महिन्यात 1 लाख 51 हजार 718 कोटी रुपये जमा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कर संकलनात वाढ झाली आहे. मागील महिन्यात 1 लाख 51 हजार 718 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले. यापूर्वी एप्रिल महिन्यात सर्वाधिक जीएसटी जमा झाला होता. देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली. सलग आठव्या महिन्यात देशात जीएसटी 1.4 लाख कोटींहून अधिक जमा झाला आहे.
यंदाच्या वर्षात दुसऱयांदा कर संकलनाचा उच्चांक गाठला गेला. ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळी यासारखे महत्त्वाचे सण-समारंभ आल्यामुळे खरेदीमध्ये मोठी वाढ दिसून आली. खरेदीत उत्साह दिसून आल्यामुळे जीएसटी संकलन दीड लाख कोटींपार पोहोचले आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कर संकलन 1,51,718 कोटी रुपये इतके आहे. त्यापैकी सीजीएसटी हा 26 हजार 039 कोटी रुपये इतका होता. तर, राज्यांच्या वाटा हा 33 हजार 396 कोटी रुपयांचा आहे. आयजीएसटी 81 हजार 778 कोटी रुपये आहे. यातील 37,297 कोटी रुपये हे आयात करण्यात आलेल्या वस्तूंचे असून 10,505 कोटी रुपये उपकरातून जमा झाल्याचे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. एकंदर ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलनात 16.6 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये 8.3 कोटी ई-वे बिल जनरेट झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ई-वे बिल 7.7 कोटी रुपये होते. जीएसटी करात वाढ होणे ही बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक बाब समजली जाते.
महाराष्ट्रातून सर्वाधिक 23,037 कोटी जमा
ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक जीएसटी संकलन हे महाराष्ट्रातून झाले. महाराष्ट्रात 23 हजार 037 कोटींचा जीएसटी जमा झाला. तसेच कर्नाटक दुसऱया स्थानी असून 10,996 कोटी रुपये करसंकलन झाले. त्यापाठोपाठ तामिळनाडूतून 9,540 कोटी, गुजरात 9,469 कोटी आणि उत्तर प्रदेशातून 7,839 कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला.
सप्टेंबर महिन्यात 1.47 लाख कोटी
सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख 47 हजार 686 कोटी रुपये झाले. सप्टेंबरमध्ये एकूण जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटी 25,271 कोटी रुपये, राज्य जीएसटी 31,813 कोटी आणि एकात्मिक जीएसटी संकलन 80,464 कोटी रुपये इतके होता. एकात्मिक जीएसटी संकलनामध्ये, वस्तूंच्या आयातीवर 41,215 कोटी आणि 10,137 कोटींचे उपकर संकलन झाले आहे. यामध्ये आयात मालावर 856 कोटींचा उपकर लावण्यात आला. याशिवाय सप्टेंबर महिन्यात 1.1 कोटीहून अधिक महामार्ग आणि ई-वे बिले काढण्यात आली. त्यापैकी 72.94 लाख ई-इनव्हॉइस आणि 37.74 लाख ई-वे बिले आहेत.
चालू आर्थिक वर्षातील संकलन
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात एप्रिलमध्ये एकूण 1,67,540 कोटी जीएसटी संकलन झाले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. त्यानंतर हा आकडा मे महिन्यात 1,40,885 कोटी, जूनमध्ये 1,44,616 कोटी, जुलैमध्ये 1,48,995 कोटी इतका होता. ऑगस्ट महिन्यात 1,43,612 कोटी आणि सप्टेंबर महिन्यात 1,47,686 कोटींचे जीएसटी संकलन करण्यात आले.
एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम
एप्रिल 2022 मध्ये पहिल्यांदाच जीएसटी संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. एप्रिलमध्ये एकूण जीएसटी महसूल 1,67,540 कोटी रुपये नोंदवला गेला. यामध्ये सीजीएसटी 33,159 कोटी रुपये, एसजीएसटी 41,793 कोटी रुपये, आयजीएसटी 81,939 कोटी रुपये आणि सेस 10,649 कोटी रुपये होता. एप्रिलनंतर आता ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा जीएसटी संकलनाने दीड लाख कोटींचा टप्पा पार केल्याने अर्थव्यवस्थेत तेजीचे वारे दिसू लागले आहेत.









